मुंबई : नवी मुंबई विमानतळाला भूमीपुत्र दि. बा. पाटील यांचेच नाव देण्याची लोकांची तीव्र भावना आहे, या भावनांचा आदर सरकारने केला पाहिजे. भाजपा महायुती सरकार व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जाणीवपूर्वक दि. बा. पाटील यांचे नाव देण्यास टाळाटाळ करत आहे. नवी मुंबई विमानतळाचा उल्लेख सध्या ‘एन.एम’ विमानतळ असा केला जात आहे. ‘एन.एम’ म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव दिले जात असेल तर. वेळ प्रसंगी रस्त्यावर उतरून लढा देऊ, असा इशारा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिला.
नवी मुंबई विमानतळाचा उल्लेख सध्या एन.एम विमानतळ असा केला जात आहे. विमानतळाच्या कुंपणाच्या भिंतीवरही एनएम अक्षरे कोरली जात आहेत. हे एनएम म्हणजे नरेंद्र मोदी विमानतळ असे तर नाही ना असा दाट संशय बळावत चालला आहे. अहमबादच्या क्रिकेट स्टेडियमचे सरदार वल्लभभाई पटेल यांचे नाव बदलून नरेंद्र मोदी यांचे दिले आहे, पण असा कोणताही कावेबाज पणा भाजपा वा देवेंद्र फडणवीस यांनी करू नये.
लोकसभेत काँग्रेसच्या खासदारांनी या प्रश्नी आवाज उठवला आहे, राज्यसभेतही ही मागणी लावून धरली जाईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जरी दि. बा. पाटील यांचे नाव देण्याचे आश्वासन दिले असले तरी त्यांचा कावा सर्वांना माहित आहे. ‘फडणविसांचा कावा ना कळे ब्रह्मदेवा’, असा आहे, असे सपकाळ म्हणाले.
नवी मुंबईच्या विकासासाठी स्थानिकांनी जमिनी दिल्या व त्यावेळी भूमिपुत्राच्या हक्कांसाठी दि. बा. पाटील यांनी दीर्घ लढा दिला. १२.५ टक्के योजना ही दि. बा. पाटील यांच्या आंदोलनामुळेच शक्य झाली आहे. दि. बा. पाटील यांची आमदार व खासदार अशी प्रदिर्घ राजकीय कारकिर्द राहिली आहे. नवी मुंबईत, जेएनपीटी, नैना प्रकल्प, नवी मुंबई विमानतळ विकसीत होत असताना भूमिपुत्रांनी दिलेल्या योगदानाकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी रास्त असून जनभावनेचा आदर केला पाहिजे, असे ते म्हणाले.
एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या..
सातारा जिल्ह्यातील सावरी गावात एमडी ड्रग्जचा कारखाना उघड झाला असून ज्या जागेत हा काळा धंदा सुरू होता ती जागा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भावाच्या नावावर आहे. हा प्रकार सर्वात प्रथम काँग्रेस पक्षाने उघड करून कठोर कारवाईची मागणी केली होती. भ्रष्टाचाराचा पैसा कमी पडतो की काय म्हणून आता अंमली पदार्थांचा धंदा करुन पैसा मिळवला जात आहे. या सरकारला जनाची तर नाहीच पण मनाचीही नाही. एवढे सर्व उघड होऊनही एकनाथ शिंदे यांचा एमडी ड्रग्जच्या कारखान्याशी संबंध नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात. हा प्रकार अत्यंत गंभीर असून एकनाथ शिंदे यांचा राजीनामा घेतला पाहिजे, असेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.
