मुंबई : यंदा गणेशोत्सवासाठी विमानाने कोकणात जायची संधी मुंबई महानगरातील चाकरमान्यांना मिळणार आहे. फ्लाय ९१ विमान कंपनी येत्या १५ ऑगस्टपासून नवी मुंबई – सिंधुदुर्गातील चिपी विमानतळदरम्यान थेट विमान सेवा सुरू करणार आहे. यामुळे कोकणवासियांना अवघ्या एका तासात कोकणात पोहोचता येणार आहे. या विमान सेवेमुळे सिधुदुर्गात मोठ्या संख्येने पर्यटक येण्याची शक्यता असल्याने पर्यटनात वाढ होण्यास मदत होईल.

सध्या चिपी विमानतळावरून पुणे, हैदराबाद आणि बेंगळुरू या शहरांसाठी विमानसेवा उपलब्ध आहे. शनिवार आणि रविवार वगळता इतर सर्व दिवशी ही सेवा सुरू असते. मात्र गेल्या दोन वर्षांपासून मुंबई – सिंधुदुर्ग दरम्यान थेट विमानसेवा बंद असल्यामुळे प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. विशेषतः मुंबईत राहणाऱ्या कोकणवासीयांना आपल्या गावी ये-जा करण्यासाठी रस्ते किंवा रेल्वे मार्गावर अवलंबून राहावे लागत होते.

आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी थेट विमान सेवा अत्यंत सोयीची ठरणार आहे. गर्दी लक्षात घेऊन जादा विमानांची सोयही करण्यात येणार आहे. त्यानंतर भविष्यात इंडिगोची विमान सेवाही या मार्गावर उपलब्ध होणार आहे. विमान सेवेचा फायदा केवळ स्थानिक नागरिकांनाच नाही, तर व्यावसायिक, गुंतवणूकदार आणि पर्यटकांनाही होणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील समुद्रकिनारे, किल्ले, धार्मिक स्थळे आणि नैसर्गिक सौंदर्य पाहण्यासाठी दरवर्षी मोठ्या संख्येने पर्यटक येत असतात. दरम्यान, विमान सेवा सुरू झाल्याने पर्यटकांना मुंबईतून सिंधुदुर्गमध्ये पोहोचणे अधिक सोपे होईल. त्यामुळे प्रवाशांच्या प्रवास वेळेत मोठी बचत होणार आहे.

फ्लाय ९१ ही गोव्यातील प्रादेशिक विमान कंपनी आहे. महाराष्ट्रात जळगाव, पुणे, मुंबई या शहरांदरम्यान विमान सेवा पुरवते. सोलापूर – गोवा आणि सोलापूर – हैदराबाद विमानसेवा सध्या तात्पुरती बंद आहे.