मुंबई : नवी मुंबईतील सिडकोच्या अखत्यारितील रेल्वे स्थानकांच्या देखभालीचा गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. ट्रान्स हार्बर आणि हार्बर मार्गावरील सिडकोच्या ताब्यातील उर्वरित १४ रेल्वे स्थानके मध्य रेल्वे प्रशासनाकडे हस्तांतरित करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यामुळे आता या स्थानकांचा कारभार, देखभाल-दुरुस्ती, स्वच्छता आणि प्रवासी सुविधांची जबाबदारी पूर्णपणे मध्य रेल्वेकडे आली आहे.
सिडको आणि मध्य रेल्वे यांच्यातील समन्वयाच्या अभावामुळे नवी मुंबईतील स्थानकांच्या देखभालीचा प्रश्न अनेक वर्षांपासून रखडला होता. देखभालीचे करार संपल्यानंतर स्थानकांवरील स्वच्छता, दुरुस्ती आणि विविध प्रवासी सुविधांबाबत समस्या निर्माण झाल्या होत्या. दोन्ही प्राधिकरणांकडून जबाबदारी निश्चित न झाल्याचा फटका मात्र प्रवाशांना बसत होता.
मध्य रेल्वेच्या मुख्यालयात मे २०२६ मध्ये झालेल्या बैठकीत या हस्तांतरणाबाबत सकारात्मक चर्चा झाली. त्यावेळी सहा महिन्यांत सिडकोच्या अखत्यारितील सर्व स्थानके मध्य रेल्वेकडे हस्तांतरित करण्याचे निश्चित करण्यात आले होते. यामध्ये स्थानक इमारती, फोरकोर्ट, प्रवासी पार्किंग, विद्युत उपकेंद्र, दूरसंचार यंत्रणा आदींचा समावेश आहे. या स्थानकांचे संचालन, नियमित देखभाल, प्रवासी सुरक्षा आणि सेवा व्यवस्थापन आता मध्य रेल्वेकडून केले जात आहे.
नवी मुंबईतील एकूण १७ स्थानकांपैकी तारघर, बामणडोंगरी आणि खारकोपर ही तीन स्थानके जून २०२६ मध्येच मध्य रेल्वेकडे हस्तांतरित करण्यात आली होती. आता उर्वरित १४ स्थानकांचे हस्तांतरणही मुदतीपूर्वी पूर्ण करण्यात आले. त्यामुळे सिडकोच्या अखत्यारितील या सर्व १७ स्थानकांचा कारभार आता मध्य रेल्वेकडे आला आहे. हस्तांतरित झालेल्या १४ स्थानकांमध्ये वाशी, सानपाडा, जुईनगर, नेरूळ, सीवूड्स-दरावे, बेलापूर, ऐरोली, रबाळे, घणसोली, कोपरखैरणे, तुर्भे, खांदेश्वर, मानसरोवर आणि खारघर या स्थानकांचा समावेश आहे.
या हस्तांतरणामुळे स्थानकांची देखभाल, स्वच्छता, प्रकाश व्यवस्था, फलाटांची दुरुस्ती, लिफ्ट, सरकते जिने आणि इतर प्रवासी सुविधांबाबत निर्णय घेण्यासाठी आता एकच प्रशासकीय यंत्रणा कार्यरत राहणार आहे. त्यामुळे प्रवाशांच्या तक्रारींचे निराकरण आणि सुविधांची देखभाल अधिक प्रभावीपणे होण्याची अपेक्षा आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सिडको आणि मध्य रेल्वेच्या प्रशासकीय तिढ्यात अडकलेल्या स्थानकांचा ताबा अखेर रेल्वेकडे गेल्याने नवी मुंबई आणि ठाणे परिसरातील लाखो प्रवाशांना याचा फायदा होण्याची अपेक्षा आहे.
