मुंबई : पंचतारांकित हॉटेलने स्वच्छतेच्या सर्व नियमांचे पालन केलेआहे आणि त्यांच्या स्वयंपाकघरात केवळ दोन झुरळं आढळली म्हणून त्यांचा परवाना निलंबित ठेवणे कितपत योग्य ? असा प्रश्न उच्च न्यायालयाने उपस्थित केला. तसेच अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) कारवाईच्या पद्धतीवर प्रश्न उपस्थित करून नवी मुंबईस्थित पंचतारांकित हॉटेलचा व्यवसाय परवाना पूर्ववत करण्याचे आदेश न्यायालयाने एफडीएला दिले.
विविध आस्थापनांतील उपहारगृहांवर कारवाईच्या करताना आजपर्यंत किती मंत्र्यांच्या मालकीच्या हॉटेल्सची तपासणी केली ? किती सरकारी आस्थापनांतील उपहारगृहांवर कारवाई केली ? कठोर कारवाई केवळ खासगी आस्थापनांतील उपहारगृहांवरच का ? असे प्रश्नही न्यायालयाने उपस्थित केला. तसेच, मंत्रालय, उच्च न्यायालयासह सर्व सरकारी आणि निमसरकारी आस्थापनांतील उपहारगृहांची तातडीने तपासणी करण्याचे आदेश न्यायालयाने एफडीएला दिले.
नेत्यांच्या मालकीच्या आस्थापनांतील उपहारगृहांची तपासणी करण्याचे स्पष्ट करताना या सगळ्या कारवाईची चित्रफित शुक्रवारच्या सुनावणीत सादर करण्याचेही आदेश प्रभारी मुख्य न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती गौतम अंखड यांच्या खंडपीठाने एफडीएला दिले. आजपर्यंत तुम्ही किती मंत्र्यांच्या मालकीच्या आस्थापनांवर कारवाई केली ? तसेच उच्च न्यायालयातील उपाहारगृहातील स्वयंपाकगृहांची तपासणी केली ? एवढेच नव्हे तर राज्यातील सर्वात महत्त्वाची इमारत असलेल्या मंत्रालयातील उपहारगृहातील स्वयंपाकगृहांची कधी पाहाणी केली का ? अशी विचारणाही खंडपीठाने एफडीएला उपरोक्त आदेश देताना केली.
अस्वच्छता आणि नियमांचे उल्लंघन केल्याच्या कारणास्तव नवी मुंबईतील एका पंचतारांकित हॉटलेचा व्यवसाय परवाना रद्द केल्याशी संबंधित सुनावणीच्या वेळी न्यायालयाने एफडीएच्या कारवाई करण्याच्या कार्यपद्धतीबाबत प्रश्न उपस्थित केला. या हॉटेलने सर्व नियमांचे पालन केले असले तरी अद्याप त्यांच्या स्वयंपाकगृहात एक झुरळ फिरताना आढळल्याची माहिती एफडीएने मागील सुनावणीच्या वेळी न्यायालयाला दिली होती. याच कारणास्तव हॉटेलला तूर्त तरी दिलासा दिला जाऊ शकत नसल्याची भूमिका एफडीएने बुधवारच्या सुनावणीत मांडली. त्यावर, कथित नियमांच्या उल्लंघनाच्या तुलनेत हॉटेलचा परवाना निलंबित ठेवणे योग्य आहे का ?
असा प्रश्न न्यायालयाने केला. तसेच, नियमानुसार ७९ टक्के स्वच्छता राखणे अनिवार्य आहे. हॉटेलच्या तिसऱ्या तपासणीत तिथे ९५ टक्के स्वच्छता असल्याचे स्पष्ट झाले, तर त्यांच्या स्वयंपाकगृहात केवळ एक-दोन झुरळ फिरताना आढळली म्हणून परवाना निलंबित करण्याची कारवाई कायम ठेवणे योग्य नाही, असे न्यायालयाने म्हटले.
भारतात आहोत, वास्तवादी दृष्टीकोनाचा अवलंब करावा लागेल
स्वच्छतेशी तडजोड केली जाऊ शकत नाही. त्यामुळे, एक झुरळ किंवा दहा झुरळ आढळली, तरी त्याने फरक पडत नाही. या बाबतीत नियमांचे पालन न करणे खपवून घेतले जाऊ शकत नाही, असे सरकारी वकील नेहा भिडे यांनी न्यायालयाला सांगितले. त्यावर, गेल्या आठवड्यात आमच्या टेबलावरही एक मोठे झुरळ आढळले होते. म्हणून मी काम बंद करायचे का ? असा मिश्किल प्रश्न यावेळी न्यायालयाने केला. त्याचप्रमाणे, आपण भारतात आहोत. त्यामुळे आपल्याला वास्तववादी दृष्टिकोन ठेवावा लागेल. निलंबनाची कारवाई ही केवळ गंभीर स्वरूपाच्या उल्लंघनासाठीच केली जावी, नियमांच्या प्रत्येक उल्लंघनासाठी नव्हे, अशी टिप्पणी करून हॉटेलला दिलासा दिला.
एफडीएतर्फे निवडक कारवाई नाही
मुंबई महानगरपालिकेच्या उपहारगृहांसह मुंबईतील अनेक उपहारगृहांची तपासणी करण्यात आली आहे आणि नियमांचे उल्लंघन केल्यामुळे काही उपहारगृहे बंदही करण्यात आली आहेत, असे सरकारी वकिलांनी न्यायालयाला सांगितले. यात कोणतीही निवडक कारवाई केली जात नसल्याचा दावाही त्यांनी केला. महापालिका, केईएम रुग्णालय, क्रिकेट क्लब ऑफ इंडिया (सीसीआय) आणि मुंबईतील इतर प्रमुख क्लब्सच्या उपहारगृहांचीही तपासणी करण्यात आली असून अन्नसुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन केल्यामुळे ती बंद करण्यात आल्याचे सरकारी वकिलांनी न्यायालयाला सांगितले.
