मुंबई : गणेशमूर्तींना वाहण्यात येणारे फुलांचे निर्माल्य विसर्जित न करता त्यापासून गणेशमूर्ती तयार करण्यात आली आहे. नवी मुंबईतील कोपरखैरणे येथील मोरया सांस्कृतिक कला व क्रीडा मंडळाच्या वतीने ‘कोपरखैरणेचा इच्छापूर्ती’ ही गणेशमूर्ती निर्माल्यातून साकारण्यात आली असून पर्यावरण संवर्धनाचा संदेश त्यातून देण्यात आला आहे.

सुरुवातीला मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आसपासच्या मंडळांच्या मंडपातील निर्माल्य गोळा केले. मात्र, या वर्षी रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त मंडळाने मुंबई व नवी मुंबईतील विविध सार्वजनिक गणेशाेत्सव मंडळांतील भक्तांनी अर्पण केलेल्या फुलांचे निर्माल्य एकत्रित केले आहे. त्या माध्यमातून गणेशमूर्ती घडविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार मुंबई आणि नवी मुंबईतील अनेक नामांकित सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमधून, स्थानिक नागरिकांकडून, नवी मुंबई महानगरपालिका (एनएमएमसी)च्या निर्माल्य कलशांमधून तसेच विविध गणपती मंदिरांमधून मोठ्या प्रमाणावर फुलांचे निर्माल्य संकलित करण्यात आले. यात मंडळाकडूनच सुमारे ३०० ते ४०० किलो निर्माल्य जमा करण्यात आले, तर इतर मंडळे, नागरिक, मंदिरे व एनएमएमसीच्या माध्यमातून उर्वरित निर्माल्य संकलित करून एकूण सुमारे एक टन फुलांचे निर्माल्य जमा करण्यात आले.

संकलित निर्माल्यावर १००-१०० किलोच्या टप्प्यांत प्रक्रिया करण्यात आली. त्यासाठी निर्जलीकरण तंत्रज्ञान व नैसर्गिकरीत्या उन्हात सुकवण्याची पद्धत वापरण्यात आली. या पर्यावरणपूरक प्रक्रियेनंतर सुमारे २०० ते २५० किलो शुद्ध फुलांची पूड तयार झाली. ती पूड वापरून यंदाच्या रौप्यमहोत्सवी वर्षातील गणेश मूर्ती घडवण्यात आली आहे.

या संकल्पनेमागे २०२५ च्या गणेशोत्सवादरम्यान राबविण्यात आलेल्या पर्यावरणपूरक उपक्रमाचा पाया आहे. तसेच विविध मंडळांतील व असंख्य भक्तांच्या श्रद्धेचे प्रतीक असलेल्या या पवित्र फुलांपासून रौप्य महोत्सवी वर्षातील मूर्ती साकारण्यात आली आहे. विविध मंडळांची भक्ती व भावभावना एका मूर्तीत एकवटल्याने हा उपक्रम एकात्मतेचा उत्सव ठरला आहे, असे मोरया सांस्कृतिक कला व क्रीडा मंडळाचे अध्यक्ष ऋषिकेश पालवे यांनी सांगितले.

गणेशोत्सवादरम्यान मोठ्या प्रमाणावर जमा होणाऱ्या निर्माल्याची शास्त्रोक्त व पर्यावरणपूरक पद्धतीने विल्हेवाट लावण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला आहे. एरवी पाण्यात विसर्जित होणाऱ्या फुलांना नवजीवन देऊन त्यातून पुन्हा एकदा गणेशाचे रूप साकारण्यात आले आहे. मंडळाने सलग चौथ्या वर्षी केवळ फुलांच्या निर्माल्यापासून गणेशमूर्ती साकारण्याची परंपरा कायम ठेवली आहे.