मुंबई : नवी मुंबईतील बेलापूर – पेंधर मेट्रो १ मार्गिकेचा विस्तार बेलापूर – सागर संगम मेट्रो १ अ व पेंधर – नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ मेट्रो २ मार्गिकेअंतर्गत केला जाईल. या मार्गिकेच्या अंमलबजावणीसह संपूर्ण जबाबदारी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनवर (एमएमआरसी) असेल. त्यानुसार आता मेट्रो १ अ व मेट्रो २ अशा एकूण १७.०९ किमीच्या मेट्रो मार्गिकेचा प्रस्ताव एमएमआरसी तयार करीत आहे. तो महिनाभरात केंद्र सरकारकडे मंजुरीसाठी पाठवला जाईल.

सिडकोने बेलापूर – पेंधर अशी ११.१ किमी लांबीची मेट्रो मार्गिका उभारली. ही मार्गिका सध्या सेवेत आहे. त्यानंतर आता मेट्रो १ मार्गिकेचा विस्तार करण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. त्यासाठी १७.०९ किमीच्या मेट्रो १ अ व २ मार्गिकेचा सविस्तर आराखडा तयार केला आहे.

सिडको या मार्गिकेची उभारणी करणार असल्याचे बोलले जात असतानाच काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने शासन निर्णय प्रसिद्ध करून या मार्गिकांच्या अंमलबजावणीची संपूर्ण जबाबदारी सिडकोकडून काढून एमएमआरसीकडे सोपविली आहे.

मुंबईतील आरे – कफ परेड भुयारी मेट्रो ३ मार्गिकेचे बांधकाम एमएमआरसीने केले आहे. या मार्गिकेचे संचालन व व्यवस्थापनही एमएमआरसी करीत आहे. आणिक आगार – गेट वे ऑफ इंडिया मेट्रो १ मार्गिकेका बांधकाम व संचालनाची जबाबदारीही एमएमआरसीकडे आहे. आता एमएमआरसीवर नवी मुंबई मेट्रो विस्तारीकरणाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

५,५७५ कोटींचा खर्च

– १७.०९ किमीच्या मेट्रो मार्गिकेच्या कामासाठी अंदाजे ५,५७५ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. यातील अंदाजे ७१३ कोटी रुपयांचा खर्च समभाग निधीमार्फत केंद्र सरकारकडून दिला जाईल.

– या प्रकल्पासाठी केंद्र सरकारची मान्यता आवश्यक आहे. त्यामुळे आता विस्तारित मेट्रो मार्गिकेचा प्रस्ताव तयार करण्याचे काम सुरू असून महिनाभरात प्रस्ताव केंद्र सरकारकडे मान्यतेसाठी पाठविला जाणार असल्याची माहिती एमएमआरसीतील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

मुंबई विमानतळाशी जोडणी

मेट्रो १ अ मार्गिका बेलापूर – सागर संगम अशी असेल. ही मार्गिका ३.०२ किमी लांबीची आहे. यात केवळ एका स्थानकाचा समावेश आहे. तर मेट्रो २ मार्गिका पेंधर – नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ अशी १४.०७ किमी लांबीची असून या मार्गिकेत ११ स्थानकांचा समावेश आहे. ही मेट्रो मार्गिका पूर्णतः उन्नत असून मेट्रो १ अ मार्गिका मुंबई विमानतळ – नवी मुंबई विमानतळ मेट्रो ८ मार्गिकेशी जोडली जाईल. सीबीडी बेलापूर रेल्वे स्थानकही विस्तारित मेट्रो मार्गिकेशी जोडले जाईल.