मुंबई : नवी मुंबई आणि नोएडा विमानतळांवर वापर शुल्क अधिक असल्याने इंडिगो आणि एअर इंडियाने ”एरा”ला निवेदन देत नाराजी व्यक्त केली आहे. नवी मुंबई विमानतळ १६२० रुपये तात्पुरते निर्गमन वापर शुल्क आकारू शकते, तर नोएडा विमानतळ ४९० रुपये आकारू शकते. नियामक दर निश्चित करेपर्यंत विमानतळांना प्रवाशांकडून तात्पुरते शुल्क आकारण्याची परवानगी आहे.
विमानतळांचे दर निश्चित करणारी नियामक संस्था भारतीय विमानतळ आर्थिक नियामक प्राधिकरण (एरा) या दोन नवीन विमानतळांनी त्यांच्या पहिल्या पाच वर्षांसाठी प्रस्तावित केलेल्या दरांचा आढावा घेत आहे. अदानीद्वारे चालवल्या जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर देशांतर्गत निर्गमन शुल्क १७५ रुपये आकारले जाते. बेंगळूरुचे देशांतर्गत निर्गमन शुल्क ५५० रुपये ,तर कोलकाता विमानतळाचा दर ५४७ रुपये आहे. विमानतळ चालक, विमान कंपन्या आणि नियामक प्राधिकरणासह इतर भागधारकांमध्ये एप्रिलपासून याबाबत चर्चा सुरू आहे. दरम्यान मुंबई आणि नवी मुंबई विमानतळ यांच्यातील दर समान ठेवण्याचा प्रस्ताव एराला देण्यात आला आहे.
एअर इंडियाने ”एरा”ला सादर केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, विमान कंपन्या
“गंतव्यस्थाने वाढवण्याऐवजी अधिक उत्पन्न देणाऱ्या मार्गांना ” प्राधान्य देतील. त्यामुळे नोएडा विमानतळाच्या वाहतूक अंदाजांचे आणि दरांच्या गृहितकांचे पुनर्मूल्यांकन करणे आवश्यक आहे. विमानतळाच्या विकासाला चालना देण्यासाठी, पहिल्या नियंत्रण कालावधीतील दरवाढ दरवर्षी १० टक्क्यांपेक्षा जास्त नसावी. देशातील सर्वात मोठी विमान कंपनी असलेल्या इंडिगोने म्हटले आहे की, दर शाश्वत राहणे आवश्यक आहे. नवी मुंबईतील काही प्रस्तावित शुल्क मुंबई आणि जेवर विमानतळापेक्षा जास्त आहे. वापर शुल्क कमी झाल्यास प्रवासी संख्या वाढण्यास मदत होईल.
