मुंबई : सिडकोच्या अखत्यारीतील नवी मुंबई परिसरातील रेल्वे स्थानके येत्या सहा महिन्यांत मध्य रेल्वेकडे हस्तांतरित करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यास रेल्वे प्रशासनाने तत्त्वतः मान्यता दिली आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे खासदार नरेश म्हस्के यांच्या पुढाकाराने मध्य रेल्वे आणि सिडको प्रशासनातील अधिकाऱ्यांची; तसेच शिवसेना पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक शुक्रवारी झाली. या बैठकीत स्थानकांच्या हस्तांतरणासह पावसाळापूर्व कामे आणि दैनंदिन देखभाल तातडीने करण्याचा निर्णय घेण्यात आला.

नवी मुंबईतील रेल्वे स्थानकांची दुरवस्था, अपुऱ्या प्रवासी सुविधा आणि रखडलेली देखभाल याबाबत प्रवाशांकडून सातत्याने तक्रारी येत असल्याची माहिती खासदार नरेश म्हस्के यांनी बैठकीत दिली. वाशी-बेलापूर मार्गावरील स्थानकांचा देखभाल करार २००३ मध्ये, तर खारघर-खांदेश्वर मार्गावरील करार २००८ मध्ये संपुष्टात आला होता. त्यानंतर नव्याने करार करण्यात आला नव्हता. तसेच ऐरोली, रबाळे, घणसोली, कोपरखैरणे, तुर्भे, बामणडोंगरी, खारकोपर आणि खारघर स्थानकांसाठी आजतागायत कोणताही देखभाल करार करण्यात आलेला नसल्याची बाबही बैठकीत निदर्शनास आणून देण्यात आली.

या प्रश्नाची गंभीर दखल घेत केंद्रीय रेल्वेमंत्री आश्विनी वैष्णव यांनी रेल्वे प्रशासनाला तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश दिल्याचे म्हस्के यांनी सांगितले. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, सहा पदरी महामार्ग आणि नव्या नागरी प्रकल्पांमुळे नवी मुंबईतील रेल्वे पायाभूत सुविधांवर भविष्यात मोठा ताण येणार असल्याने मानखुर्द-बेलापूर, ठाणे-तुर्भे-वाशी-नेरुळ आणि नेरुळ-उरण मार्गावरील स्थानके मध्य रेल्वेकडे हस्तांतरित करणे अत्यावश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले.

याशिवाय ‘अमृत भारत’ योजनेअंतर्गत स्थानकांचे नूतनीकरण, बंद तिकीट खिडक्या सुरू करणे, रबाळे, दिघा आणि ऐरोली परिसरातील भुयारी मार्ग व पादचारी पुलाची कामे तातडीने सुरू करण्याची मागणीही बैठकीत करण्यात आली. रेल्वे अधिकाऱ्यांनी स्थानक हस्तांतरणाची प्रक्रिया सहा महिन्यांत पूर्ण करण्यास सहमती दर्शवली असून पावसाळापूर्व कामे आणि दैनंदिन देखभाल मध्य रेल्वेमार्फत करण्यात येईल, असे लेखी आश्वासन पुढील आठवड्यात देण्यात येणार असल्याचे बैठकीत स्पष्ट करण्यात आले. बैठकीला सिडकोचे जीएमडी डॉ. राजा दयानिधी, मध्य रेल्वेचे वरिष्ठ प्रिन्सिपल चीफ इंजिनिअर रजनीश माथूर, चीफ इंजिनिअर नवीन पाटील यांच्यासह शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.