मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या २६४० घरांच्या सोडतीतील महागडी घरे अखेर मोठ्या संख्येने विजेत्यांनी नाकारली आहेत. तब्बल ३६ टक्के म्हणजे ९५९ विजेत्यांनी मंडळाला घरे परत (सरेंडर) केली असून केवळ १६८१ विजेत्यांनी घरे स्वीकारली आहेत. सोडतीतील सर्वाधिक महागड्या घरांना अर्थात ३३ (७) योजनेअंतर्गत उपलब्ध झालेल्या घरांना विजेत्यांनी नापसंती दर्शवली आहे. १८८ विजेत्यांपैकी तब्बल ५९ टक्के म्हणजे ११२ विजेत्यांनी घरे परत केली आहेत.
मुंबई मंडळाने मुंबईतील बोरिवली, गोरेगाव, जुहू, वांद्रे, दादर, ताडदेव, वडाळा, विक्रोळी आदी ठिकाणच्या २६४० घरांसाठी ६ ऑगस्ट रोडत सोडत काढली. सोडतीनंतर विजेत्यांना ई-स्वीकृतीपत्र वितरित करून त्यांच्याना घरांची स्वीकृती सादर करण्यास सांगण्यात आले. त्यानुसार विहित मुदतीत १६८१ विजेत्यांनी घरास स्वीकृती दिली. त्यानुसार निवासी दाखला मिळालेल्या घरांसाठीच्या विजेत्यांना तात्पुरते देकारपत्र वितरित करून त्यांच्याकडून घराच्या विक्री किमतीच्या २५ टक्के रक्कम भरून घेण्यास सुरुवात करण्यात आल्याची माहिती मुंबई मंडळातील अधिकाऱ्यांनी दिली.
त्याचवेळी तब्बल ९५९ विजेत्यांनी घरे नाकारली असून, घरे परत करणाऱ्यांचे प्रमाण ३६ टक्के आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, काही विजेत्यांना एकापेक्षा अधिक घरे लागल्याने त्या विजेत्यांनी घरे परत केली. तर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदाच्या सोडतीत म्हाडाची घरे प्रचंड महाग असल्याने, उत्पन्न आणि घरांच्या किमतीत प्रचंड तफावत असल्याने, गृहकर्ज मिळण्याची शक्यता नसल्याने घरे परत करणाऱ्यांची संख्या मोठी आहे.
उपलब्ध माहितीनुसार, २६४० सोडतीत चालू बांधकाम प्रकल्पातील १७६२ घरांचा समावेश असून, घरांसाठीच्या तब्बल ६७० विजेत्यांनी घरे परत केली आहेत. घरे परत करणाऱ्यांपैकी सर्वाधिक विजेते या योजनेतील आहेत. तर सोडतीतील ३३(५) योजनेतील ३७१ घरांसाठीच्या विजेत्यांपैकी ४८ विजेत्यांनी, तर ३३(७) योजनेतील १८८ घरांसाठीच्या विजेत्यांपैकी ११२ विजेत्यांनी घरे परत केली आहेत. ३३(७) योजनेतील घरे सर्वाधिक महाग होती. त्यामुळे ही महागडी घरे नाकारणाऱ्या विजेत्यांचे प्रमाण ५९ टक्के आहे.
त्याचवेळी या सोडतीत विखुरलेली, अर्थात जुनी, विक्रीवाचून रिक्त राहिलेली ३१९ घरे समाविष्ट होती. या घरांसाठीच्या विजेत्यांपैकी ४० टक्के, अर्थात १२९ विजेत्यांनी घरे परत केल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. घरे परत करणाऱ्यांमध्ये एकापेक्षा अधिक घरांसाठी विजेते ठरलेल्या विजेत्यांची संख्या अधिक असल्याचे मंडळातील अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. मात्र यावेळी घरे नाकारणाऱ्यांची संख्या मोठी असून, यातील अधिकाधिक विजेत्यांनी घरे महागडी असल्याने घरे नाकारल्याची चर्चा आहे. तर ९५९ घरे नाकारली गेली असली तरी या घरांसाठी तितकीच प्रतीक्षायादी आहे.आता लवकरच प्रतीक्षायादीवरील विजेत्यांना संधी दिली जाईल. त्यामुळे घरे रिकामी राहणार नाहीत, असा विश्वासही अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. प्रतीक्षायादीवरील विजेत्यांची स्वीकृती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नेमकी किती घरे रिक्त राहतात, हे स्पष्ट होईल.
