मुंबई : महाराष्ट्र सरकार सिंधुदुर्ग आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळादरम्यान थेट विमानसेवा सुरू करण्यासाठी प्रयत्नशील आहे. नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाच्या प्रादेशिक कनेक्टिव्हिटी उडान योजनेअंतर्गत १०० टक्के व्यवहार्यता तफावत निधी (व्हायबिलिटी गॅप फंडिंग) देऊन विमान कंपन्यांना आकर्षित करण्याचा राज्याचा विचार आहे. पर्यटन आणि व्यापारासाठी मुंबई व कोकण किनारपट्टी य दरम्यान हवाई संपर्क निर्माण करून, विमान भाडे ३,५८० रुपयांपर्यंत मर्यादित ठेवण्याचे राज्याचे उद्दिष्ट आहे.

‘उडान’अंतर्गत नव्याने विकसित झालेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला सिंधुदुर्ग (चिपी) विमानतळाशी जोडणारी थेट विमानसेवा चालवण्यासाठी व्यावसायिक विमान कंपन्यांच्या प्रस्तावासाठी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी लिमिटेडने (एमएडीसी) मागणी केली आहे. या बहुप्रतिक्षित हवाई मार्गाद्वारे मुंबईच्या व्यापारी केंद्राला थेट कोकण किनारपट्टीशी जोडण्याची कल्पना आहे. मात्र प्रादेशिक विमान कंपन्यांमार्फत हा मार्ग कार्यान्वित करण्याचे राज्याचे यापूर्वीचे प्रयत्न अयशस्वी ठरल्याने, हा मार्ग शाश्वत आणि स्वयंपूर्ण व्यावसायिक हवाई वाहतुकीसाठी वारंवार अपयशी ठरला आहे.

योजनेतील ठळक मुद्दे

राज्य सरकार श्रेणी-२ विमानातील (४० ते ८० आसनी) ५० टक्के जागांसाठी आणि श्रेणी-३ विमानातील (८० पेक्षा जास्त आसनी) ३८ जागांसाठी १०० टक्के मदत देणार आहे. ई-निविदेनुसार, नवी मुंबई ते सिंधुदुर्ग या ३७४ किमीच्या प्रवासासाठी प्रवासी भाडे ३,५८० रुपये आणि ३८८ किमीच्या परतीच्या प्रवासासाठी ३,७३५ रुपये निश्चित करण्याचे राज्याचे उद्दिष्ट आहे. प्रति सीट ६,३७० रुपयांपर्यंतचे कमाल तिकिट असणार आहे.

विमान कंपन्यांसाठी बंधनकारक बाबी

निवडलेल्या विमान कंपन्या ग्राउंड हँडलिंग, प्रवासी प्रक्रिया आणि ई-तिकिटिंगसह संपूर्ण व्यावसायिक कामकाज सांभाळतील. शिवाय, ऑपरेटर्सना नॉन-आरसीएस इन्व्हेंटरी खुली करण्यापूर्वी सर्व सवलतीच्या आरसीएस सीट्स विकण्यास प्राधान्य द्यावे लागणार आहे. जर एखादे विमान १५ दिवसांच्या आत बदलीची व्यवस्था न करता सलग दोन दिवसांपेक्षा जास्त काळ जमिनीवर थांबवून ठेवल्यास, एमएडीसी प्रति कार्यरत दिवस १ लाख रुपयांचा दंड आकारणार आहे. याव्यतिरिक्त, सलग दोन महिने ७५ टक्के प्रवासी उपस्थिती राखण्यात अयशस्वी ठरणाऱ्या ऑपरेटर्सना व्यवहार्यता तफावत निधी मिळणार नाही. तसेच करार देखील रद्द होण्याची शक्यता आहे.

एअरबस ए३२१ विमानांसाठी परवाना

सिंधुदुर्ग चिपी विमानतळ आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चरद्वारे विकसित आणि संचालित असून, त्याला एअरबस ए३२१ विमानांसाठी परवाना मिळाला आहे. तीन कोड-सी विमाने (प्रमाणित नॅरो बॉडी विमानांच्या आकाराची) उभी करता येतात आणि कोड-ए, बी व सीसाठी प्रत्येकी एक अशा आणखी तीन पार्किंग जागांचे बांधकाम सुरू आहे.