BJP Navnath Ban Criticizes Eknath Shinde Shivsena: शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकीत शिवसेनेने (एकनाथ शिंदे गट) महायुतीचा धर्म पाळला नसल्याने तीन जागांवर पराभव पत्करावा लागल्याचा आरोप भाजपचे महाराष्ट्राचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी केला. एका जागेसाठी मित्रपक्षांचे नुकसान करण्याची भूमिका महायुतीच्या हिताची नसल्याचे सांगत त्यांनी शिवसेनेला लक्ष्य केले. एका जागेच्या हव्यासापोटी मित्रपक्षांना अडचणीत आणण्याची भूमिका महायुतीच्या हिताची नसल्याची टीकाही त्यांनी गुरुवारी एक्स या समाजमाध्यमावर व्यक्त होताना केली.
विधान परिषदेच्या पाच शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांतील निवडणुकीत महाविकास आघाडीने तीन, तर महायुतीने दोन जागा जिंकल्या. पदवीधर मतदारसंघांच्या तिन्ही जागांवर महाविकास आघाडीने विजय मिळवला. पुणे शिक्षक मतदारसंघात भाजपचे कौस्तुभ गावडे, तर अमरावती शिक्षक मतदारसंघात शिवसेनेचे किरण सरनाईक विजयी झाले. या निकालांच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील समन्वयाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.
पुण्यात सानप यांना पाठिंबा
पुणे शिक्षक मतदारसंघात भाजपने कौस्तुभ गावडे यांना उमेदवारी दिली होती. शिवसेनेचे मंगेश चिवटे यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केल्याने महायुतीत पेच निर्माण झाला होता. त्यांनी माघार घेतल्यानंतर शिवसेनेने अपक्ष सचिन सानप यांना पाठिंबा दिला. त्यामुळे भाजप आणि शिवसेना यांच्यातील मतभेद उघड झाले.
या लढतीत कौस्तुभ गावडे यांनी विजय मिळवला. सानप यांना लक्षणीय मते मिळाली. मात्र त्यांना विजय मिळवता आला नाही. भाजपच्या मते, शिवसेनेने अधिकृत महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा दिला असता, तर युतीतील मतविभाजन टाळता आले असते. पुणे पदवीधर मतदारसंघात भाजपच्या डॉ. स्मिता जाधव यांना पराभव स्वीकारावा लागला. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या हर्षदा देशमुख-जाधव यांनी ही जागा जिंकली. त्यामुळे पुण्यातील दोन्ही मतदारसंघांचे निकाल भाजपसाठी महत्त्वाचे ठरले.
नागपूरमध्ये भाजपला धक्का
नागपूर पदवीधर मतदारसंघात काँग्रेसचे अभिजित वंजारी यांनी भाजपचे सुधाकर कोहळे यांचा ३,२७१ मतांनी पराभव केला. वंजारी यांना ६७ हजार २३१, तर कोहळे यांना ६३ हजार ९६० मते मिळाली. भाजपसाठी प्रतिष्ठेच्या असलेल्या या मतदारसंघातील पराभवामुळे पक्षाच्या स्थानिक संघटनात्मक ताकदीवरही प्रश्न उपस्थित झाले आहेत.
संभाजीनगरमध्ये राष्ट्रवादीचा पराभव
छत्रपती संभाजीनगर पदवीधर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रतापसिंह पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार सतीश चव्हाण यांचा पराभव केला. पाटील यांना ७४ हजार ४३ मते, तर चव्हाण यांना ६० हजार ८७८ मते मिळाली. या निवडणुकीत अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराच्या विरोधात प्रचार केल्याचा आरोप बन यांनी केला आहे. त्यामुळे महायुतीतील घटक पक्षांनी एकमेकांना सहकार्य केले नसल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला.
पाचपैकी तीन जागा गमावल्याची खंत
अमरावती शिक्षक मतदारसंघात शिवसेनेचे किरण सरनाईक यांनी काँग्रेसच्या अदिती पोहरे यांचा पराभव करून जागा कायम राखली. त्यामुळे पाचपैकी दोन जागा महायुतीला मिळाल्या. पुणे आणि अमरावतीतील शिक्षक मतदारसंघांत महायुतीला यश आले. मात्र पुणे, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर या तीन पदवीधर मतदारसंघांत पराभव झाला.
मित्रपक्षावर तोंडसुख
शिवसेनेने महायुतीचा धर्म पाळून भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसला सहकार्य केले असते, तर पाचही जागांवर महायुतीचा विजय झाला असता, असा दावा बन यांनी केला. एका जागेसाठी मित्रपक्षांचे नुकसान करण्याची भूमिका युतीसाठी घातक असल्याचेही त्यांनी म्हटले. या निकालांमुळे महायुतीतील जागावाटप, बंडखोरी आणि परस्पर सहकार्याचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे.…
