शिवसेनेने सुरू केलेल्या शिवसंपर्क अभियानाअंतर्गत मुख्यमंत्री ठाकरे यांची सभा शनिवारी वांद्रे-कुर्ला संकुलातील मैदानावर झाली. या सभेत मुख्यमंत्री ठाकरे यांनी भाजपचे हिंदुत्व, केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर त्याचबरोबर राणा दाम्पत्यासह किरीट सोमय्या यांच्यावरही निशाणा साधला आहे. मातोश्रीवर हनुमान चालिसा म्हणायला आलेले पळून गेले अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी राणा दाम्पत्यावर टीका केली. याला आता नवनीत राणा यांनी दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेत प्रत्युत्तर दिले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“जेव्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सत्ता जाईल आणि तेव्हा रश्मी ठाकरेंना तुरुंगात टाकले तर त्यांना मी कसे वाटते असे विचारणार आहे. कोणताही गुन्हा न करता तुरुंगात टाकल्याच्या दुःख काय असते हे त्यांना विचारणार आहे. ती वेळही लवकरच येणार आहे जेव्हा तुमची सत्ता जाईल आणि तुमच्या घरातील महिला तुरुंगात जाईल. तेव्हा मी विचारणार तुम्हाला कसे वाटते,” अशी टीका नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे.

“मुख्यमंत्र्यांनी काल गदा हातात न घेता त्याला करंट लागत असल्यासारखे वर्तन केले. उद्धव ठाकरेंनी गदेचा अपमान केला. मुख्यमंत्र्यांनी कालच्या सभेत शेतकरी, बेरोजगारी, लोडशेडिंगबद्दल काहीही उल्लेख केला नाही. फक्त दुसऱ्यांवर बोलण्यासाठी ती सभा होती. अडीच वर्षे मुख्यमंत्री कार्यालयात गेले नाहीत. मुख्यमंत्री विदर्भ, मराठवाड्यात गेल्याचं त्यांच्या मुलाने सांगितलं. पण त्यांच्या दौऱ्याचा फक्त एकतरी व्हिडीओ त्यांनी जाहीर करावा. देवेंद्र फडणवीसांच्या सरकारनंतर तिप्पट प्रमाणात राज्यात बेरोजगारी वाढली आहे. औरंगजेबाच्या कबरीवर फूल वाहणाऱ्यांवर एक शब्द बोलले नाहीत. सत्तेत आल्यानंतर औरंगाबादचं नाव संभाजीनगर करायचं तुम्हीच म्हणाला होता. पण सभेत बोलताना त्याची काही गरज नाही म्हणता. एक नाव बदलू शकत नाहीत, इतके लाचार मुख्यमंत्री आहेत,” असे नवनीत राणा म्हणाल्या.

“मला म्हणाले हनुमान चालिसा काश्मीरमध्ये जाऊन म्हणा. जर मी काश्मिरमध्ये हनुमान चालिसा पठण करू शकते तर महाराष्ट्रात का नाही? मी नवनीत राणा, रवी राणाच्या फायद्यासाठी हनुमान चालिसा म्हणणार नव्हते. तुम्ही पुरुष आहात, माझ्यापेक्षा महिलेपेक्षा जास्त शक्तिशाली आहेत. पण तुम्ही तुमच्या शक्तीचा गैरवापर केलात. हनुमान चालिसा म्हणण्याची मागणी करणाऱ्या महिलेला तुम्ही देशद्रोहाच्या आरोपाखाली जेलमध्ये टाकता. पण औरंगजेबाच्या कबरीवर फूल वाहणाऱ्यांबद्दल एक शब्दही बोलत नाहीत. शिवसेना औरंगजेबाची सेना झाली आहे का?,” असा सवालही नवनीत राणा यांनी केला.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Navneet rana criticizes cm uddhav thackeray abn
First published on: 15-05-2022 at 11:53 IST