scorecardresearch

“आम्ही आंदोलन संपवत आहोत”, राणा दांपत्याची मोठी घोषणा; मातोश्रीवर जाणार नाही, दिलं ‘हे’ कारण!

रवी राणा म्हणतात, “मातोश्री, हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आमच्या ह्रदयात आहेत. मी कुठलंही चुकीचं भाष्य वापरलेलं नाही. पण…!”

ravi rana navneet rana
संग्रहीत छायाचित्र

गेल्या दोन दिवसांपासून नवनीत राणा आणि रवी राणा यांनी मातोश्रीवर जाऊन हनुमान चालीसा पठण करण्याच्या केलेल्या घोषणेची जोरदार चर्चा सुरू होती. तेव्हापासून या मुद्द्यावर वाद देखील निर्माण झाला होता. आज सकाळपासूनच शिवसेना कार्यकर्त्यांनी मातोश्रीबाहेर आणि नवनीत राणा यांच्या मुंबईतील निवासस्थानाबाहेर गर्दी केली होती. या पार्श्वभूमीवर राणा दांपत्यानी मातोश्रीवर जाण्याचा निर्णय रद्द केला असून आंदोलन संपवत असल्याचं जाहीर केलं आहे.

का आटोपतं घेतलं आंदोलन?

२३ एप्रिल रोजी आपण मातोश्रीवर जाऊन हनुमान चालीसा वाचणार असल्याचं राणा दांपत्यानं जाहीर केलं होतं. मात्र, आज दुपारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत राणा दांपत्यानं आंदोलन थांबवण्याचा निर्णय जाहीर केला आहे. “राज्यात पोलिसांना, सामान्य जनतेला त्रास होऊ नये आणि उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदींचा प्रस्तावित मुंबई दौरा रद्द होऊ नये यासाठी आम्ही आंदोलन थांबवण्याचा निर्णय घेतला आहे”, असं रवी राणा यांनी सांगितलं.

“महाराष्ट्रात कुणाला घाबरण्याचं काम नाही. कुणाच्याही धमक्यांना घाबरण्याचं काम नाही. आम्ही कुठल्या दबावालाही बळी पडणारे लोक नाही. आम्ही लोकांची सेवा करून आणि विधानभवन आणि लोकसभेत पोहोचलो आहोत. आज आम्ही ठरवलंय की पूर्ण महाराष्ट्रात पोलीस, जनतेला त्रास होत आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी जरी हनुमान चालीसेचा अवमान केला असला तरी सगळ्यांना होणारा त्रास पाहाता आमचं आंदोलन आम्ही संपवत आहोत”, असं रवी राणा यांनी स्पष्ट केलं.

“मुख्यमंत्र्यांना हात जोडून विनंती केली होती की…”

“मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना हात जोडून विनंती केली होती की हनुमान जयंतीच्या निमित्ताने मातोश्रीवर आपण हनुमान चालीसा वाचा. महाराष्ट्रात तुम्ही मुख्यमंत्री झाल्यापासून संकटं आले आहेत. तेव्हापासून राज्याची जनता त्रस्त आहे. मातोश्री, हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आमच्या ह्रदयात आहेत. मी कुठलंही चुकीचं भाष्य वापरलेलं नाही. पण मातोश्रीवर हनुमान चालीसा हनुमान जयंतीच्या दिवशी न वाचणं, आमचा विरोध करणं हे त्यांनी केलं”, असं रवी राणा यावेळी म्हणाले.

“झुकेगा नहीं साला”, ९२ वर्षांच्या आजीबाईंचा राणा दांपत्याला ‘पुष्पा’स्टाईल इशारा; मुख्यमंत्र्यांनी फोन करून घेतलं बोलावून!

“मुख्यमंत्र्यांनीच आमच्या घरावर हल्ला केला”

दरम्यान, यावेळी बोलताना रवी राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केला. “आज आम्ही मातोश्रीवर हनुमान चालीसा वाचायला जाणार होतो. पण सकाळीच पोलिसांनी आम्हाला घरी डिटेन केलं. काही शिवसेना कार्यकर्त्यांना पाठवून आमच्यावर मुख्यमंत्र्यांनी हल्ला केला. घरावर दगडफेक केली. रवी राणा, नवनीत राणांना मारा, त्यांच्या घरावर हल्ला करा असा आदेशच कुठेतरी मुख्यमंत्र्यांनी शिवसेना कार्यकर्त्यांना दिला असावा. राज्याची कायदा-सुव्यवस्था मुख्यमंत्रीच बिघडवत असतील, तर हे राज्याचं दुर्भाग्य आहे”, असं ते म्हणाले.

“मुख्यमंत्र्यांना फार इगो आहे”

“आत्ता जर काही लोक भजन आणि हनुमान चालीसा वाचत आहेत, तर ते हनुमान जयंतीच्या दिवशी वाचलं असतं किंवा आज आमच्यासोबत वाचलं असतं तर त्यांना काय अडचण होती? मला वाटतंय मुख्यमंत्र्यांना फार इगो आहे. एखाद्या माणसाचा इगो आणि हिटलरशाही डोक्यावर जाते, तेव्हा जनता त्यांना धडा शिकवत असते”, असं देखील रवी राणा यावेळी म्हणाले.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Navneet rana ravi called off protest hanuman chalisa on matoshree targets uddhav thackeray pmw

ताज्या बातम्या