खासदार नवनीत राणा आणि मुंबई पोलीस यांच्यातील वाद आणखीनच चिघळला आहे. नवनीत राणा यांनी मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांची तक्रार करणार असल्याचे सुत्रांकडून सांगण्यात येत आहे. राणा यांनी मुंबई पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. अटकेत असताना पोलिसांकडून अयोग्य वागणूक मिळाल्याचा आरोप नवनीत राणा यांनी केला आहे.

मुंबई पोलिसांकडून आरोपांचे खंडण
या संदर्भात लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे नवनीत राणा यांनी तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची दखल घेत राणा यांना संसदीय समितीसमोर हजर राहण्याची नोटीस बजावण्यात आली होती. त्यामुळे आता नवनीत राणा संसदीय समितीसमोर काय जबाब देणार हे महत्वाचं ठरणार आहे. राणांच्या जबाबावर समितीची पुढची भुमिका ठरणार आहे. तर मुंबई पोलिसांनी नवनीत राणांचे सगळे आरोप फेटाळले आहेत.

नेमकं प्रकरण काय?
अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं खाजगी निवासस्थान मातोश्रीबाहेर येऊन हनुमान चालिसा म्हणणार असल्याची घोषणा केली होती. त्यासाठी राणा दाम्पत्य मुंबईत दाखल झालं होतं. त्यामुळे शिवसैनिक आणि राणा दाम्पत्यांच्या यांच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा तणाव निर्माण झाला होता.

यावेळी राणा दाम्पत्यांनी प्रक्षोभक विधाने करून कायदा व सुव्यवस्था बिघडवल्याच्या आरोपाखाली २३ एप्रिलला त्यांना अटक झाली होती. त्यांच्या विरोधात पोलिसांनी भादंवि कलम १२४ अ नुसार राजद्रोह, राज्य सरकारविरोधात प्रक्षोभक विधाने करणे आणि सरकारला आव्हान देणे आदी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. ५ मे रोजी राणा दामपत्याची जामीनावर सुटका करण्यात आली.

लोकसभा अध्यक्षांकडे तक्रार

सुटकेनंतर राणा दामपत्य दिल्लीत दाखल झाले होते. ९ मे रोजी त्यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतली होती. या आगोदर त्यांनी बिर्ला यांना एक पत्रही लिहले होते. त्यात अटकेदरम्यान मुंबई पोलिसांकडून आपल्याला अयोग्य वागणूक मिळाली असल्याचा आरोप राणा यांनी केला आहे. तसेच आपल्याला काही गोष्टींपासून वंचित ठेवण्यात आल्याचेही नवणीत राणा यांचे म्हणणे आहे.