मुंबई : मुंबईत नवरात्रोत्सवात यंदा तीन दिवस म्हणजे १७ ते १९ दिवस सकाळी सहा ते मध्यरात्री १२ वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक आणि ध्वनिवर्धक वापरण्यास परवानगी देण्यात आली आहे. यापूर्वी अष्टमी आणि नवमी या दोन दिवसांसाठीच ही सवलत दिली जात असे. यंदा १७ ऑक्टोबरला सप्तमीच्या दिवशीही ध्वनिक्षेपकाच्या वापराला परवानगी देण्याचा आदेश मुंबई उपनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी काढला आहे.

ध्वनी प्रदूषण (नियमन व नियंत्रण) नियम, २००० मधील तरतुदींनुसार सांस्कृतिक कार्यक्रम आणि धार्मिक कारणांसाठी वर्षभरातील निर्धारित १५ दिवसांमध्ये रात्री १२ वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक वापरण्याची सवलत देता येते. नवरात्रोत्सवातील सप्तमीच्या दिवशीही ही सवलत मिळावी, अशी विनंती जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आली होती. त्यावर मुंबई पोलिसांकडून अभिप्राय मागविण्यात आला. पोलिसांनी परवानगी देण्यास हरकत नसल्याचे कळवल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी पूर्वीच्या आदेशात बदल करत तीन दिवसांची परवानगी दिली आहे.

नव्या आदेशानुसार १७ ऑक्टोबरला शनिवार, १८ ऑक्टोबरला रविवार, आणि १९ ऑक्टोबरला सोमवारी मध्यरात्रीपर्यंत ध्वनिक्षेपक वापरता येतील. मात्र, ही परवानगी ध्वनी प्रदूषणाच्या निर्धारित मर्यादांचे पालन करण्याच्या अटीवर देण्यात आली आहे.

न्यायालयाच्या आदेशांचे पालन बंधनकारक

ध्वनिक्षेपक वापरण्याची ही सवलत सरकारने घोषित केलेल्या शांतता क्षेत्रांना लागू होणार नाही. ध्वनी प्रदूषणासंदर्भात उच्च न्यायालयाने वेळोवेळी दिलेल्या आदेशांचे पालन करणेही बंधनकारक आहे. ध्वनी प्रदूषण नियमांतील तरतुदींचे उल्लंघन होणार नाही, याची दक्षता संबंधितांनी घ्यावी, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. याशिवाय, पूर्वीच्या आदेशातील अन्य अटी कायम असतील.