scorecardresearch

नौदलाकडून दुर्घटनेची चौकशी; ‘आयएनएस रणवीर’ स्फोट प्रकरण

अपघातात जखमी झालेल्या ११ नौसैनिकांची अवस्था गंभीर नसल्याचेही नौदलाकडून स्पष्ट करण्यात आले.

‘आयएनएस रणवीर’ स्फोट प्रकरण

मुंबई : नौदलाच्या ‘आयएनएस रणवीर’ या युद्धनौकेवर मंगळवारी झालेल्या स्फोटात तीन नौसैनिकांचा मृत्यू झाला़. तर  ११ नौसैनिक जखमी झाले. अपघात कसा झाला, याबाबत अद्याप नौदलाकडून माहिती मिळाली नसली तरी मृतांचे आणि जखमींचे तपशील नौदलाकडून देण्यात आले आहेत.

‘आयएनएस रणवीर’ स्फोटात कृष्णनकुमार गोपीराव (४६ वर्षे), सुरेंद्रकुमार वालिया (४७ वर्षे), अरविंदकुमार सिंग (३८ वर्षे) या तीन अधिकाऱ्याचा मृत्यू झाला. ते तिघेही मास्टर चीफ पेटी ऑफिसर पदावर कार्यरत होते. अपघातानंतर तिघांचेही मृतदेह जे. जे. रुग्णालयात पाठवण्यात आले. तसेच मृत्युप्रकरणी कुलाबा पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद झाली असून अपघाताची चौकशी नौदलाकडून सुरू झाली आहे.

 अपघातात जखमी झालेल्या ११ नौसैनिकांची अवस्था गंभीर नसल्याचेही नौदलाकडून स्पष्ट करण्यात आले. जखमींवर नवल रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पी. व्ही. रेड्डी (२३ वर्षे), योगेशकुमार गुप्ता (३६ वर्षे), गोपाल यादव (२१ वर्षे), शुभम देव (२० वर्षे), हरीकुमार (२२ वर्षे), शैलेन्द्र यादव (२२ वर्षे), तन्मय दार (२२ वर्षे), एल. सुरेंद्रजीत सिंग (३९ वर्षे), कोमेंद्र्रंसग (२४ वर्षे), कपिल (२१ वर्षे), अविनाश वर्मा (२२ वर्षे) अशी जखमींची नावे आहेत.

मुंबईतील काही मोठे अपघात 

२०११ ते २०१६ दरम्यान नौदलाच्या युद्धनौकांचे पाच मोठे अपघात मुंबई येथे झाले आहेत. २०११ मध्ये ‘आयएनएस विंध्यगिरी’ मुंबई डॉकमध्ये प्रवेश करत असताना त्याची मालवाहू जहाजाशी टक्कर झाली होती. या अपघातात विंध्यगिरीमध्ये आग लागल्यामुळे जहाज समुद्रात बुडाले होते. ऑगस्ट २०१३ मध्ये ‘आयएनएस सिंधुरक्षक’ पाणबुडीवर मोठा स्फोट झाला होता. यात १८ कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. ही पाणबुडी समुद्रात बुडाली होती.

फेब्रुवारी २०१४ मध्ये ‘आयएनएस सिंधुरत्न’ पाणबुडीवर आग लागली होती. या वेळी दोन अधिकाऱ्याचा मृत्यू झाला, तर सात कर्मचारी जखमी झाले होते. या घटनेनंतर तत्कालीन नौदल प्रमुख अ‍ॅडमिरल डी.के. जोशी यांनी घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला होता. २०१४ मध्येच ‘आयएनएस कोलकाता’वर वायुगळती झाली होती. यात एका अधिकाºयाचा मृत्यू झाला होता. २०१६ मध्ये ‘आयएनएस बेतवा’ ही युद्धनौका मुंबई डॉकमध्ये असताना एका बाजूला कलंडल्यामुळे झालेल्या अपघातात दोन कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला, तर १४ जण जखमी झाले होते. त्यानंतर जानेवारी २०२२ मध्ये ‘एनएनएस रणवीर’ या युद्धनौकेवर  स्फोट  झाला. यामध्ये तीन अधिकाऱ्याचा मृत्यू झाला असून ११ नौसैनिक जखमी झाले आहेत.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Navy investigates accidents ins ranvir blast case akp

ताज्या बातम्या