मुंबईतील डॉकयार्डमध्ये मंगळवारी मध्यरात्री नौदलाच्या आयएनएस सिंधूरक्षक पाणबुडीमध्ये स्फोट होऊन त्याला आग लागली. या दुर्घटनेमध्ये नौदलाच्या तीन अधिकाऱयांसह १८ नाविकांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. आगीमुळे सिंधूरक्षक पाणबुडीला जलसमाधी मिळालीये. 
पाणबुडीला आग लागल्यानंतर लगेचच नौदलाचे अग्निशामक बंब आणि मुंबई महापालिकेचे अग्निशामक दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले. घटनेनंतर पाणबुडीच्या काही भाग पाण्यावर तरंगताना दिसत आहे. स्फोटामुळे पाणबुडीचे नेमके किती नुकसान झाले आहे, याची माहिती अद्याप मिळालेली नाही. या संपूर्ण घटनेची चौकशी करण्याचे आदेश नौदलाने दिले आहेत. नौदलप्रमुख ऍडमिरल डी. के. जोशी हे मुंबईमध्ये दाखल झाले आहेत. संरक्षणमंत्री ए. के. ऍंटनी यांनी या घटनेबद्दल पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांना माहिती दिली असून, ते देखील परिस्थितीची पाहणी करण्यासाठी मुंबईमध्ये येणार आहेत. संसदेबाहेर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, देशसेवा करताना शहीद झालेल्या जवानांमुळे मला अतिशय दुःख झाले आहे. भारतीय नौदलासाठी हा खूप मोठा धक्का आहे.
सिंधूरक्षक पाणबुडीत काही सुधारणा करण्यात आल्यानंतर ३-४ महिन्यांपूर्वीच रशियामधून ती परतली होती. पाणबुडीमध्ये जहाजविरोधी क्षेपणास्त्रांसह इतर शस्त्रास्त्रेदेखील होती, अशी माहिती उपलब्ध झाली आहे.