गुजरातच्या द्वारकामध्ये ३५० कोटी रुपयांचं ड्रग्ज सापडल्यानंतर या मुद्द्यावरून आता वातावरण तापू लागलं आहे. यासंदर्भात आत्तापर्यंत ड्रग्ज प्रकरणावरून भाजपाकडून आरोप केले जात असताना आता राष्ट्रवादी काँग्रेसनं देखील यावरून निशाणा साधला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी यावरून भाजपावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे. हा सगळा ड्रग्जा खेळ गुजरातमधून चालतोय का? असा सवाल नवाब मलिक यांनी मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत उपस्थित केला आहे.

आज गुजरातच्या द्वारकामधून तब्बल ३५० कोटी किमतीचं ड्रग्ज सापडल्यामुळे आता गुजरात ड्रग्ज रॅकेटचं केंद्र बनू लागलंय का? असा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला आहे. यावरून नवाब मलिक यांनी गुजरात सरकारमधील एका मंत्र्याचं देखील नाव घेतलं आहे.

“आता आम्ही मागे हटणार नाही”, नवाब मलिक यांच्या कन्येचा देवेंद्र फडणवीसांना इशारा, पाठवली अब्रुनुकसानीची नोटीस!

“मुंद्रानंतर द्वारकामध्ये देखील ३५० कोटींचं ड्रग्ज पकडलं गेलं. हा योगायोग आहे का? मनीष भानुशाली, धवल भानुशाली, किरण गोसावी, सुनील पाटील हे सगळे लोक वारंवार अहमदाबादमध्ये नोवाटेल आणि फाईव्ह स्टार हॉटेल्समध्ये राहिले आहेत. गुजरातचे मंत्री किरीटसिंह राणा यांच्याशी त्यांचे जवळचे संबंध आहेत. हे सगळे ड्रग्जच्या खेळाचे खेळाडू आहेत. आता असा प्रश्न उभा राहातो की ड्रग्जचा खेळ गुजरातहून तर नाही ना चालत?” असा सवाल नवाब मलिक यांनी केला आहे.

राज्यात २-३ ग्रॅमची कारवाई करायची आणि…

“राज्यातून ३ ग्रॅम, २ ग्रॅमची कारवाई करून, सेलिब्रिटींची परेड करून लोकांचं लक्ष विचलित केलं जावं आणि गुजरातमधून ड्रग्जचा धंदा अविरतपणे चालत राहावा असं नियोजन आहे का ही शंका लोकांच्या मनात उभी राहात आहे. एनआयएकडे मुंद्रा पोर्टचा तपास आहे. द्वारकामध्ये साडेतीनशे कोटींचं ड्रग्ज पकडलं गेलं. आशा आहे की याचा तपास योग्य दिशेने होईल. कोण किती मोठा आहे, किती प्रभावी आहे, कोणत्या पक्षाचा नेता आहे हे न पाहाता एनआयए आणि एनसीबीचे विभागीय संचालक किंवा एनसीबीचे डीजी योग्य पद्धतीने तपास करावा. ड्रग्जची सगळी खेप गुजरातमधून येत असेल, देशात पसरत असेल, तर एनसीबीचे डीजी यावर कारवाई करतील आणि गुन्हेगारांना शिक्षा देण्याचं काम करतील, अशी आशा आहे”, असं देकील मलिक यावेळी म्हणाले.

गुजरातमध्ये तब्बल ३५० किलो ड्रग्ज जप्त, महाराष्ट्रातल्या भाजी विक्रेत्याला अटक; पाकिस्तान कनेक्शनही उघड

म्हणून मुलीने फडणवीसांना पाठवली नोटीस!

नवाब मलिक यांच्या कन्या निलोफर मलिक खान यांनी देवेंद्र फडणवीस यांना अब्रुनुकसानीची नोटीस बजावली आहे. यासंदर्भात विचारणा केली असता नवाब मलिक यांनी त्यावर स्पष्टीकरण दिलं आहे. “राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पत्रकार परिषदेमधअये आमच्या जावयाबाबत काही आरोप केले होते. त्यांच्याकडे ड्रग्ज सापडल्याचं म्हटलं गेलं. आमच्या मुलीने देवेंद्र फडणवीस यांना एक नोटीस पाठवली आहे. त्यांनी माफी मागावी अशी मागणी केली आहे. जर त्यांनी क्षमा मागितली नाही, तर त्यांच्याविरोधात मानहानीचा दावा, क्रिमिनल आणि सिविल केस दाखल केली जाईल. या देशात बोलण्याचा अधिकार आहे, पण अपमान करण्याचा अधिकार नाही. त्यासाठीच देवेंद्र फडणवीसांना नोटीस पाठवली आहे”, असं नवाब मलिक म्हणाले.