क्रूझ ड्रग्ज प्रकरणातील तपास अधिकारी समीर वानखेडे यांच्या अडचणी कमी होताना दिसत नाही. एनसीबीचे दक्षता पथक समीर वानखेडे यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांच्या तपासात गुंतले आहे. दरम्यान, राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे उपाध्यक्ष अरुण हलदर यांनी रविवारी समीर वानखेडे यांच्या घरी जात भेट घेतली. तत्पूर्वी, वानखेडे यांनी शनिवारी अरुण हलदर यांची भेट घेऊन त्यांच्यावरील धर्मांतराच्या आरोपांवर स्पष्टीकरण दिले होते. या बैठकीनंतर आयोगाचे उपाध्यक्ष म्हणाले होते की, जर कोणी अनुसूचित जातीच्या अधिकाऱ्यावर जातीच्या आधारावर आरोप केले तर आयोग अशा प्रकरणी गप्प बसणार नाही. त्यानंतर आता नवाब मलिक यांनी हलदर यांच्या भेटीवरून टीका केली आहे.

 “ज्या व्यक्तीला तुम्ही सामाजिक न्याय विभागाच्या पदावर बसवले आहे ती व्यक्ती विभागाचे अधिकार स्वतःकडे घेत आहेत. याची आम्ही राष्ट्रपतींकडे तसेच सामाजिक न्याय विभागाच्या मंत्र्यांकडे तक्रार करणार आहोत. तसेच या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी करणार आहोत. ज्या व्यक्तीने बनावट प्रमाणपत्र बनवून एका मागासवर्गीयाचे अधिकार हिरावून घेतले. त्यांनी मला धमकी दिलीय. जास्त बोललात तर अ‍ॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करुन तुरुंगात टाकू. ते जास्त बोलत आहेत. जी व्यक्ती दलित नाही त्यावरून मला घाबरवण्याचे काम करत आहात. सर्वानी मर्यादेत राहायला हवं. आपल्या पदाची प्रतिष्ठा राखायला हवी. त्यांचा अधिकार हिरावून घेऊ नये. आम्ही याची तक्रार करणार आहोत,” असे नवाब मलिक यांनी म्हटले आहे.

रविवारी भेटीदरम्यान राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे उपाध्यक्ष अरुण हलदर यांनी समीर वानखेडे यांनी केलेले कार्य एनसीबीसाठी अभिमानास्पद असल्याचे म्हटले होते. वानखेडे यांनी नेहमीच प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे ते राजकीय वादळात अडकले. वानखेडे यांच्यावर वैयक्तिक आरोप करणे चुकीचे आहे, असे हलदर म्हणाले.

अरुण हलदर यांनी रविवारी समीर वानखेडे यांच्या घरी जाऊन जात प्रमाणपत्र तपासल्यानंतर ते अनुसूचित जातीतील असल्याचे त्यांनी सांगितले. समीरची आई मुस्लीम असून तिचे निधन झाले आहे आणि तिचा पहिला विवाह एका मुस्लिम महिलेसोबत झाला होता जिची विशेष विवाह कायद्यांतर्गत नोंदणी करण्यात आली होती. आंतरधर्मीय विवाहात हा विवाह वैध असल्याचे अरुण हलदर यांनी सांगितले.