“सगळे सेलिब्रिटी मालदीवमध्ये असताना समीर वानखेडे तिथे काय करत होते?” नवाब मलिक यांनी केला खळबळजनक आरोप!

नवाब मलिक यांनी एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप करत मालदीव आणि दुबईमधील व्यवहारांविषयी प्रश्न उपस्थित केले आहेत.

Nawab Malik Sameer Wankhede
संग्रहीत छायाचित्र

आर्यन खान प्रकरणानंतर एनसीबी आणि एनसीपी अर्थात समीर वानखेडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्यामध्ये सातत्याने आरोप-प्रत्यारोप होत आहेत. नवाब मलिक यांनी क्रूजवर टाकण्यात आलेल्या छाप्यावर देखील अनेक प्रश्न उपस्थित केले असताना आता त्यांनी थेट समीर वानखेडे यांच्यावरच गंभीर आरोप केले आहेत. करोना काळात सगळे सेलिब्रिटी मालदीवमध्ये असताना समीर वानखेडे आणि त्यांचे कुटुंबीय मालदीवमध्ये होते, असा खळबळजनक दावा नवाब मलिक यांनी केला आहे. तसेच, त्यासंदर्भातले फोटो देखील आपण देणार असल्याचं नवाब मलिक म्हणाले आहेत.

“मालदीवमध्ये सर्व वसुली झाली!”

नवाब मलिक यांनी आज माध्यमांशी बोलताना समीर वानखेडे यांच्यावर नव्याने काही आक्षेप घेत गंभीर आरोप केले आहेत. यामध्ये सर्व वसुली मालदीवमध्ये झाल्याचं ते म्हणाले आहेत. “कोविड काळात सगळी इंडस्ट्री मालदीवमध्ये होती. समीर वानखेडे आणि त्यांचे कुटुंबीय देखील त्या काळात मालदीवमध्ये होते. ते दुबई आणि मालदीवमध्ये काय करत होते? आम्ही मागणी करतो की त्यांनी सांगावं ते दुबईला गेले होते का? सगळी वसुली मालदीव आणि दुबईत झाली, ज्याचे फोटो आम्ही तुम्हाला देऊ”, असं नवाब मलिक म्हणाले.

“सुशांतसिंहच्या आत्महत्येनंतर लगेच वानखेडेंची एनसीबीत बदली”

“सुशांतसिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर समीर वानखेडे यांची केंद्र सरकारने एनसीबीमध्ये बदली केली. त्याचा तपास सीबीआयला दिला गेला. एसीबीचा खेळ सुरू झाला. लगेच रिया चक्रवर्ती हिला अटक करण्यात आली. काही लोकांना खोट्या प्रकरणांमध्ये फसवण्याचा प्रयत्न करण्यात आला. ४-४ हजार रुपयांच्या पेमेंटच्या आधारावर गुन्हा दाखल करण्यात आला. व्हॉटस्ॲप चॅटच्या माध्यमातून बऱ्याच अभिनेत्री व अभिनेत्यांना एनसीबीच्या दारात उभे करण्यात आले व दहशत निर्माण करण्याचे काम झाले”, असा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे.

मनसे नवाब मलिकांविरोधात आक्रमक

दरम्यान, नवाब मलिक यांनी समीर वानखेडेंची बहीण यास्मिन वानखेडेवर आरोप केले असताना त्यावर मनसेनं तीव्र आक्षेप घेतला आहे. “नवाब मलिक हे कुठले डॉन आहेत का? सर्वजण नवाब भाई बोलतात. त्यांनी एखाद्या महिलेला लेडी डॉन बोलणे चुकीचं आहे. जास्मिन वानखेडेवर केलेले आरोप बिनबुडाचे आहेत. चांगल्या कामाच्या मागे मनसे नेहमीच उभी राहील” असं मनसे चित्रपट सेनेचे प्रमुक अमेय खोपकर म्हणाले आहेत. “महाराष्ट्रात जिथे चित्रपटांची शूटिंग चालतं तिथे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते जाऊन वसुली करतात, त्यांची लिस्ट देतो त्यांना अटक करून दाखवा,” असं आव्हान देखील खोपकर यांनी नवाब मलिक यांना दिलं आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Nawab malik allegations sameer wankhede maldive dubai jasmeen wankhede family pmw

Next Story
टीएमटी बस बंद पडून वाहतूक ठप्प
ताज्या बातम्या