आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात रोज नवनवे खुलासे होत आहेत. समीर वानखेडे आणि नवाब मलिक यांचे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. मंत्री नवाब मलिक यांनी मंगळवारी एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर बेकायदेशीर फोन टॅपिंगचा आरोप केला आहे. ते समीर वानखेडेंच्या कुकर्मांबद्दल पत्र लवकरच सुपूर्द करतील, असंही त्यांनी सांगितलं. समीर वानखेडे मुंबई आणि ठाण्यात दोन व्यक्तींमार्फत काही लोकांचे मोबाईल फोन बेकायदेशीरपणे टॅप करत आहेत. तसेच वानखेडे यांनी पोलिसांकडून त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचे कॉल डिटेल रेकॉर्ड (सीडीआर) मागितले होते, असा दावाही मलिक यांनी केला आहे.

“माझ्यावर जे प्रश्न विचारत आहेत, त्यांना मला विचारायचं आहे. माझ्या जावयाला तुरुंगात बंद करण्यात आलेलं आहे. माझी मुलगी अनेक गोष्टींची चौकशी करत आहे. समीर वानखेडेंनी मुंबई पोलिसांना पत्र लिहिलं आहे की, तिचे सीडीआर उपलब्ध करून द्यावेत. निलोफर मलिक गुन्हेगार आहे का? कोणत्या आधारावर त्यांनी ही माहिती मागितली? मला वाटतंय की वानखेडे मर्यादा ओलांडत आहे. समीर वानखेडे दोन लोकांच्या मदतीने लोकांचे फोन टॅप करत आहेत. लोकांचे कॉल्स इंटरसेप्ट केले जात आहे. दोन खासगी लोक आहेत. एक व्यक्ती मुंबईत आहे, तर एक व्यक्ती ठाण्यात आहे. समीर वानखेडे कशा पद्धतीने लोकांचे फोन टॅप करत आहे, याचेसुद्धा पुरावे मी समोर आणणार आहे”, असा गौप्यस्फोट मलिक यांनी यावेळी बोलताना केला.

दरम्यान, नवाब मलिक यांनी समीर वानखेडेंच्या पहिल्या लग्नाचे फोटो आणि जन्म प्रमाणपत्र शेअर करत त्यांच्यावर सवाल उपस्थित केले होते. एकंदरीत आर्यन खानच्या अटकेपासून सुरू झालेल्या या प्रकरणात रोज नवनवे खुलासे होत आहेत. तसेच “मी कुणाचाही धर्म काढत नाही. माझा लढा हा एका मागासवर्गीयाचा अधिकार हिरावून बोगस कागदपत्राद्वारे नोकरी मिळवणाऱ्याच्या विरोधात आहे. या प्रकरणामध्ये समीर वानखेडेंचे वडील सांगत आहेत की मी कधी धर्मपरिवर्तन केले नाही. मग खरे जन्म प्रमाणपत्र तुम्ही आणा आणि सांगा मी दिलेले प्रमाणपत्र खोटे आहे. माझ्याकडे बरीच कागदपत्रे आहेत. माझ्याकडे असे पुरावे आहेत जे ते कधीही नाकारू शकत नाहीत,” असे नवाब मलिक म्हणाले.

“आमचे लोक यासंदर्भात आणखी कागदपत्रे मिळत आहेत आणि लवकरच हे प्रकरण वैधता समिती समोर जाईल. मला एनसीबीच्या अधिकाऱ्याने एक पत्र पाठवले आहे. हेच पत्र मुख्यमंत्र्यांना देखील पाठवले आहे. हे पत्र एनसीबीच्या महासंचालकांना पाठवण्यात येणार आहे. याची चौकशी करण्याची मागणी आम्ही करणार आहोत,” असे नवाब मलिक यांनी म्हटले आहे.