scorecardresearch

महाविकास आघाडी संघर्षांच्या पवित्र्यात ; नवाब मलिक यांना अभय, आज मंत्र्यांचे धरणे

बैठकीत मलिक यांच्या अटकेचे राजकीय परिणाम, भाजपचे डावपेच व त्याला उत्तर या सर्व विषयांवर चर्चा झाली.

नबाव मलिक यांच्या अटकेच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांनी मुंबईत बुधवारी निदर्शने केली.

मुंबई :  अल्पसंख्याक विकासमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) अटक केल्यानंतर केंद्रीय यंत्रणांच्या माध्यमातून सुरू असलेल्या भाजपच्या दडपशाहीविरोधात एकजुटीने संघर्ष करण्याचा निर्धार महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बुधवारी केला. अटक झाली तरी मलिक यांचा राजीनामा घेतला जाणार नाही. तसेच  गुरुवारी महाविकास आघाडीचे मंत्री, आमदार व पदाधिकारी मंत्रालयाजवळील महात्मा गांधी यांच्या पुतळय़ासमोर केंद्र सरकारच्या दडपशाहीच्या विरोधात निदर्शने करणार आहेत.

मलिक यांच्या अटकेनंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांचे बैठकांचे सत्र सुरू झाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी पक्षाच्या मंत्र्यांची बैठक झाली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षां’ या निवासस्थानी महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक झाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, काँग्रेस नेते व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील आदी उपस्थित होते.

 बैठकीत मलिक यांच्या अटकेचे राजकीय परिणाम, भाजपचे डावपेच व त्याला उत्तर या सर्व विषयांवर चर्चा झाली. भाजपला महाराष्ट्र अस्थिर करावयाचा असल्याने ते राजकीय हेतूने एकापाठोपाठ एक मंत्र्यांवर कारवाई करतील. मग काय करणार, यावर चर्चा झाली. भाजपचे नेते आता पुढचा नंबर या मंत्र्यांचा असे जाहीर करत आहेत. त्यांच्या डावपेचांना बळी पडायचे नाही, असा निर्णय बैठकीत घेण्यात आला. त्यातूनच  मलिक यांचा राजीनामा न घेण्याचा आणि तिन्ही पक्षांनी एकजुटीने लढण्याचा निर्णय घेण्यात आला.

मलिक यांना फक्त अटक झाली आहे. त्यांच्या विरोधातील गुन्हा सिद्ध झालेला नाही. यामुळे त्यांच्या राजीनाम्याची आवश्यकता नाही, असे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. या वेळी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात व शिवसेना नेते सुभाष देसाई हे तीन पक्षांचे मंत्री या वेळी उपस्थित होते.

 नवाब मलिक हे केंद्र सरकार आणि भाजपविरोधात आवाज उठवत असल्याने त्यांचे तोंड बंद करण्यासाठी ही कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणात गेल्या २५-३० वर्षांत एकदाही मलिक यांचे नाव आले नाही. मग आताच अचानक कसे आले, असा सवाल करत सामान्य लोकांनाही हे सारे समजत असल्याची टीका भुजबळ यांनी केली. त्याचबरोबर महाराष्ट्रातील  सरकार अडचणीत आणण्यासाठी मलिक यांच्यावर राजकीय हेतूने आरोप झाल्यामुळे न्यायालयात आरोप सिद्ध होईपर्यंत त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा घेण्यात येणार नाही, असा निर्णय बैठकीत झाल्याचे भुजबळ यांनी जाहीर केले.

विविध राज्यांतून पवार-ठाकरेंना फोन

महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारला अडचणीत आणण्यासाठी भाजप हा केंद्रीय यंत्रणांचा कशारीतीने गैरवापर करत आहे हे भारतातील सर्व राजकीय पक्ष पाहत आहेत. नवाब मलिक यांच्यावरील कारवाईनंतर देशातील विविध पक्षांच्या नेत्यांनी शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली, असे छगन भुजबळ यांनी सांगितले.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Nawab malik arrest leaders of maha vikas aghadi to fight unitedly against bjp oppression zws

ताज्या बातम्या