scorecardresearch

“नवाब मलिक यांना झालेली अटक हा पुरावा आहे की सरकारविरोधात जो बोलेल त्याला…”; अभिनेत्याचा टोला

सकाळी सात ते दुपारी पावणे तीनपर्यंत अशी जवळजवळ आठ तास चौकशी केल्यानंतर नवाब मलिक यांना अटक करण्यात आली.

Nawab Malik KRK Tweet
नवाब मलिक यांना दुपारी पावणे तीनच्या सुमारास अटक करण्यात आलीय (फोटो सोशल मीडियावरुन साभार)

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना आठ तासांच्या चौकशीनंतर दाऊद इब्राहिमसंदर्भातील आर्थिक गैरव्यवहार प्रकरणामध्ये अंमलबजावणी संचालनालयाने (ईडीने) अटक केली आहे. नवाब मलिक यांची अंमलबजावणी संचालनालय (ईडी) कडून आठ तास चौकशी केल्यानंतर ईडीने ही अटकेची कारवाई केलीय. या अटकेनंतर अनेक प्रतिक्रिया समोर येत असतानाच भिनेता तसेच स्वयंघोषित चित्रपट समीक्षक कमाल आर खान म्हणजेच केआरकेनेही मलिक यांच्या अटकेवर प्रतिक्रिया दिलीय.

नवाब मलिक यांना झालेल्या अटकेवरुन केआरकेने केंद्रामध्ये सत्तेत असणाऱ्या भाजपा सरकारवर निशाणा साधलाय. ट्विटरवरुन केआरकेने सरकारविरोधात बोलणाऱ्यांना अटक होते हे या कारवाईतून सिद्ध झाल्याचं म्हटलंय.

“आज नवाब मलिक यांना ईडीने अटक केली आहे. हा पुरावा आहे की सरकारविरोधात जो बोलेल त्याला एखाद्या केंद्रीय यंत्रणेकडून अटक होऊ शकते. म्हणजेच भारतामध्ये लोकशाही पूर्णपणे संपली आहे. मी चुकीच्या धोरणांबद्दल बोलत राहणार आहे,” असं केआरकेने म्हटलं आहे.

नक्की वाचा >> Nawab Malik Arrest : “मला अटक झालीय, पण…”; अटकेनंतर नवाब मलिक यांची पहिली प्रतिक्रिया

दरम्यान आज पहाटेच ईडीचं पथक नवाब मलिक यांच्या घरी धडकलं होतं. त्यानंतर सकाळी सात वाजल्यापासून नवाब मलिक यांची मुंबईतील ईडी कार्यालयात अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरू होती. दुपारी तीनच्या सुमारास मलिक यांना अटक करण्यात आल्याची माहिती समोर आलीय.

मागील काही महिन्यांमध्ये माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यानंतर केंद्रीय यंत्रणांनी कारवाई केलेले नवाब मलिक हे राष्ट्रवादीचे सर्वात मोठे नेते आहेत. एक भंगारवाला ते राज्याचा कॅबिनेट मंत्री असा नवाब मलिक यांचा प्रवास राहिलाय. त्यांच्या अटकेबरोबरच महाविकास आघाडीच्या कॅबिनेटमधील दुसरा मंत्री आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात अडकलाय.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Nawab malik arrested by ed actor kamal r khan krk says democracy is totally finished in india scsg

ताज्या बातम्या