मुंबईतील जेएनपीटी बंदरावर तीन कंटेनर भरून अफिमच्या बिया गेल्या १५ दिवसांपासून पडून आहेत, असा दावा मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. तब्बल ५१ टन अफिमच्या बिया बंदरावर आहेत, १५ दिवस उलटूनही अद्याप गुन्हा दाखल का करण्यात आला नाही, एनडीपीएसचा गुन्हा का दाखल करण्यात आला नाही, असा सवाल नवाब मलिक यांनी डीआरआयला केला आहे.

“या देशात ड्रग्जचा भयंकर खेळ चाललाय. दोन-चार ग्रॅम अमली पदार्थ पकडून गुन्हे दाखल करण्यात येतात. मात्र, जिथे मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ जप्त केले जातात त्यांच्यावर कोणतीच कारवाई होत नाही. मग मुंद्रा बंदरावर ड्रग्ज सापडू देत, एनआयए तपास करू देत, त्याचं पुढे काहीच होत नाही. ५१ टन अफिमच्या बियांबद्दल कुठेच बोललं जात नाही. ड्रग्जचा व्यापार हा राजकीय संरक्षणाशिवाय होऊच शकत नाही,” असा आरोपही मलिक यांनी केला.

देवेंद्र फडणवीसांच्या आरोपांना प्रत्युत्तर..

“देवेंद्र फडणवीसांनी माझ्यावर आरोप केलेत. त्यांनी माझ्या जावयाच्या घरातून गांजा जप्त केल्याचं सांगितलं. मात्र माझ्या जावयाच्या घरातून कोणताही आपत्तीजनक वस्तू सापडली नाही, यासंदर्भात तुम्ही तुमचे निकटवर्तीय समीर वानखेडे यांनाही विचारू शकता,” असं नवाब मलिक म्हणाले. “६२ वर्ष या मुंबईत घालवली, कुणीतरी येऊन सांगावं की माझे अंडरवर्ल्डशी संबंध आहेत,” असं आवाहन नवाब मलिक यांनी देवेंद्र फडणवीसांना केलं. तसेच “माझे अंडरवर्ल्डशी संबंध होते, तर फडणवीस मुख्यमंत्री असताना गृहखातं त्यांच्याकडे होतं, त्यावेळी त्यांनी माझ्यावर कारवाई का केली नाही, असा सवाल उपस्थित करत मी एकमेव असा व्यक्ती आहे, ज्याने माजी मुख्यमंत्र्यांवर आणि त्यांच्या सरकारवर प्रश्न उपस्थित केलेत,” असंही मलिक म्हणाले.