आर्यन खान ड्रग्ज प्रकरणासंदर्भात मागील दीड महिन्यांपासून सुरु असणाऱ्या वादामध्ये आता राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक विरुद्ध माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात असल्याचं चित्र दिसत आहे. या आरोप प्रत्यारोपांच्या सत्रादरम्यानच देवेंद्र फडणवीस यांनी काल एका इंग्रजी लेखकाचं वाक्य ट्विट करत मलिक यांना अप्रत्यक्ष टोला लगावला होता. त्यावरुनच आता नवाब मलिक यांनी देवेंद्र फडणवीस यांना उत्तर दिल आहे. 

“देवेंद्र फडणवीस यांनी काल ट्वीटरवर मला एका जनावराची उपमा देण्याचा प्रयत्न केला आहे. भाजपाचे नेते नेहमीच प्राण्यांची नावे देत असतात. त्यातून त्यांची काय संस्कृती आहे हे दिसून येते”, असा टोलाही नवाब मलिक यांनी लगावला.

भाजपाचे नेते माणसाला माणूस समजत नाहीत. माणसाला जनावराची उपमा देणे ही यांची संस्कृती आहे. या उपाधीमुळे आमची इज्जत जात नाही उलट भाजपाची काय मानसिकता आहे हे स्पष्ट होते, असेही नवाब मलिक म्हणाले. तसेच काल भाजपा युवा मोर्च्याच्या कार्यकर्त्यांनी नवाब मलिक यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळत आंदोलन केले. यावर मलिक म्हणाले, “माझे कितीही पुतळे जाळा मी तुम्हाला आरसा दाखवणारच… आरसा दाखवल्यावर इतके का घाबरताय?”

होय मुख्यमंत्र्यांनी माझ्या कामाची प्रशंसा केली

तसेच मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी माझ्या कामाची प्रशंसा केली आणि संपूर्ण मंत्रीमंडळ माझ्या पाठीशी असल्याची माहिती नवाब मलिक यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना दिली. माझ्या पाठिशी जसे मंत्रीमंडळ आहे तसे शरद पवार व पक्ष देखील पाठिशी असल्याचेही नवाब मलिक यांनी सांगितले.

“माझी लढाई ही अन्यायाविरोधात आहे. सध्या ही लढाई लढण्यासाठी मी एकटा पुरेसा असून ही लढाई पूर्णत्वास नेल्याशिवाय थांबणार नाही,” असा स्पष्ट इशाराही नवाब मलिक यांनी दिला आहे.