“आता आम्ही मागे हटणार नाही”, नवाब मलिक यांच्या कन्येचा देवेंद्र फडणवीसांना इशारा, पाठवली अब्रुनुकसानीची नोटीस!

नवाब मलिक यांच्या कन्या निलोफर खान यांनी आता देवेंद्र फडणवीसांना अब्रुनुकसानीची नोटीस पाठवली आहे.

nilofer khan notice to devendra fadnavis
नवाब मलिक यांच्या कन्या निलोफर मलिक खान यांनी देवेंद्र फडणवीस यांना अब्रुनुकसानीची नोटीस पाठवली आहे.

आर्यन खान प्रकरणापासून राज्यात सुरू असलेला वाद अजून शमण्याची चिन्ह दिसत नाहीत. सुरुवातीला फक्त एक ड्रग्ज प्रकरण असलेला हा वाद आता राजकीय झाला आहे. नवाब मलिक यांनी सातत्याने एनसीबीवर आणि त्यासोबतच भाजपावर देखील आरोप केल्यानंतर विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील पत्रकार परिषद घेऊन नवाब मलिक आणि त्यांच्या कुटुंबियांवर गंभीर आरोप केले आहेत. पण आता त्यावर नवाब मलिक यांच्या कन्या निलोफर खान यांनी आता फडणवीसांवर पलटवार केला आहे. निलोफर खान यांनी देवेंद्र फडणवीस यांना थेट ५ कोटींची अब्रुनुकसानीची नोटीस पाठवली आहे, फडणवीसांनी माफी न मागितल्यास त्यांच्याविरोधात मानहानीचा दावा ठोकला जाईल असं देखील सांगण्यात आलं आहे.

निलोफर खान यांनी यासंदर्भात ट्वीट करून माहिती दिली आहे. “चुकीच्या आरोपांमुळे आयुष्य उद्ध्वस्त होतात. एखाद्या व्यक्तीने आरोप करताना किंवा निषेध करताना आपण काय बोलतोय याचं भान ठेवायला हवं. माझ्या कुटुंबावर देवेंद्र फडणवीसांनी लावलेल्या चुकीच्या आरोपांसाठी ही अब्रुनुकसानीची नोटीस मी पाठवली आहे. आम्ही आता मागे हटणार नाही”, असं या ट्वीटमध्ये निलोफर खान यांनी म्हटलं आहे.

“ते माजी मुख्यमंत्री आहेत. जेव्हा कोणतीही गोष्ट ते बोलतील, तर तिची खातरजमा त्यांनी करणं आवश्यक आहेत. ते सातत्याने म्हणालेत की समीर खान यांच्याकडे ड्रग्ज सापडलं. पंचनाम्यात स्पष्टपणे म्हटलेलं आहे की आमच्याकडे काहीही सापडलेलं नाही. त्यामुळे सातत्याने तुम्ही एकच आरोप करत आहात हे योग्य नाही. आम्ही त्यांना नोटीस पाठवली आहे. पाहुयात यावर त्यांचं काय म्हणणं आहे”, अशी प्रतिक्रिया निलोफर खान यांनी एबीपीशी बोलताना दिली आहे.

Devendra Fadnavis PC : १९९३ मुंबई बॉम्बस्फोटातल्या आरोपींकडून नवाब मलिकांनी साडेतीन कोटींची जमीन २० लाखांत घेतली – फडणवीसांचा बॉम्ब

देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये नवाब मलिक यांचे अंडरवर्ल्डसोबत संबंध असल्याचा दावा केला होता. यासाठी त्यांनी शहावली खान आणि सलीम पटेल या गुन्हेगारांसोबत एलबीएस रोडवरील जमीन खरेदीचा व्यवहार नवाब मलिक यांनी केल्याचे दाखले देखील दिले. यावेळी बोलताना नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांच्याकडे ड्रग्ज सापडल्याचा आरोप त्यांनी केला. भाजपाकडून देखील सातत्याने या गोष्टीवरून आरोप केले जात आहेत.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Nawab malik daughter nilofer khan targets devendra fadnavis files defamation case pmw

Next Story
‘डुक्करासोबत कुस्ती’वाल्या ट्विटवरुन फडणवीसांना राऊतांचा टोला; म्हणाले, “चिखलात लोळण्याचा कार्यक्रम…”
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी