scorecardresearch

मुंबई : मलिक खरोखर गंभीर आजाराने त्रस्त ?, जामीन नाकारताना विशेष न्यायालयाचा प्रश्न

मलिक यांनी नियमित जामिनाची मागणी करताना वैद्यकीय कारणास्तव जामीन देण्याचीही मागणी केली होती.

मुंबई : मलिक खरोखर गंभीर आजाराने त्रस्त ?, जामीन नाकारताना विशेष न्यायालयाचा प्रश्न
नवाब मलिक

कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम याच्या मुंबईतील मालमत्तांशी संबंधित आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपाप्रकरणी सध्या अटकेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक हे खरोखर गंभीर आजाराने त्रस्त आहेत, तर त्यांच्या आरोग्याची स्थिती जाणून घेण्यासाठी वैद्यकीय मंडळ स्थापन करण्याच्या अंमलबजावणी संचालनालयाकडून (ईडी) केलेल्या मागणीला त्यांनी स्वत:हून परवानगी का दिली नाही ? असा प्रश्न विशेष न्यायालयाने त्यांना जामीन नाकारताना उपस्थित केला आहे. तसेच तपशीलवार वैद्यकीय अहवालांच्या अनुपस्थितीत आणि वैद्यकीय मंडळाने मलिक यांची तपासणी न केल्यामुळे वैद्यकीय कारणास्तव मलिक यांची जामिनाची मागणी फेटाळत असल्याचे निकालपत्रात स्पष्ट केले.

कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम याच्या मुंबईतील मालमत्तांशी संबंधित आर्थिक गैरव्यवहाराच्या प्रकरणात अटकेत असलेल्या मलिक यांना विशेष न्यायालयाने गेल्या आठवड्यात जामीन नाकारला. विशेष न्यायालयाने मलिक यांना जामीन का नाकारला याची कारणमीमांसा करणाऱया ४३ पानी तपशीलवार आदेशाची प्रत मंगळवारी उपलब्ध झाली. मलिक यांनी नियमित जामिनाची मागणी करताना वैद्यकीय कारणास्तव जामीन देण्याचीही मागणी केली होती.

न्यायालयाच्या आदेशात, मलिक यांनी हसीना पारकर आणि सलीम पटेल यांच्याशी संगनमत करून मुनीरा प्लम्बर हिच्या मालकीची जागा बळकावल्याचे सकृतदर्शनी पुरावे असल्याची टिप्पणी न्यायालयाने केली. तसेच मलिक यांचे नाव अनुसूचित गुन्ह्यात नसले तरी मालमत्ता ताब्यात घेणे आणि त्यावर दावा करणे हे आर्थिक गैरव्यवहाराच्या कक्षेत येते. या प्रकरणातही सॉलिडस इन्व्हेस्टमेंट्स या कंपनीने सहआरोपी सरदार खान याला २००५ साली दिलेली जागाही खरेदी केली होती, असेही न्यायालयाने म्हटले.

हसिना पारकर आणि सलीम पटेल यांचा गोवाला कंपाऊंडच्या जमीन व्यवहारात सहभाग असल्याचे मलिक यांना माहीत होते. तसेच जमीन नेमकी कोणाच्या मालकीची आहे हे माहीत असूनही मलिक यांनी मूळ मालकांच्या नोटरीकृत पॉवर ऑफ ॲटर्नीमध्ये नमूद केलेल्या तथ्यांची पडताळणी केली नाही. त्यांनी मुनीरा प्लम्बरकडेही चौकशी केली नाही, असे न्यायालयाने नमूद केले आहे. दरम्यान, मलिक हे सध्या अटकेत असले तरी उपचारांसाठी खासगी रुग्णालयात दाखल आहेत. त्यामुळे अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मलिक यांच्या आरोग्याच्या स्थितीची पडताळणी करण्यासाठी वैद्यकीय मंडळाच्या स्थापनेसाठी अर्ज केला आहे.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 07-12-2022 at 11:07 IST

संबंधित बातम्या