मुंबई : महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी आचारसंहिता पायदळी तुडवली असून सत्ताधारी पक्षाच्या उमेदवारांना लाभ पोचवण्यासाठी अधिकारांचा मनमानी वापर चालवला आहे. या अधिकाऱ्यांच्या विरोधात राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असून न्यायालयातही जाणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार) मुंबई निवडणूक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नवाब मलिक यांनी सांगितले. तसेच मुंबईचा आगामी महापौर हा राष्ट्रवादीचा होईल, असा दावाही मलिक यांनी केला.

अजित पवार यांची राष्ट्रवादी राज्यात सत्ताधारी महायुतीमध्ये आहे. मात्र मुंबई महानगरपालिकांच्या निवडणुका स्वबळावर लढत आहे. मुंबईत पक्षाने ९४ उमेदवार पक्षाने निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहेत. प्रभाग ८७, ११९ आणि १५१ मध्ये उमेदवार अर्ज सादर करताना आचारसंहितेचे उल्लंघन झालेले आहे. जातीचा दाखला नसताना, उमेदवार अनधिकृत बांधकामात दोषी असताही अर्ज स्वीकारण्यात आले आहे. रात्री साडेदहा वाजता अधिकारी निर्णय कसे काय देवू शकतात? याविरोधात पक्ष राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार करणाt आहे. तसेच संबंधित अधिकाऱ्यांना न्यायालयात खेचणार आहोत, असे मलिक यांनी सांगितले.

काँग्रेसकडे जाणारी मुस्लीम मते खेचण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस मुंबईत स्वबळावर लढत असून पक्षाने त्यासाठी २३ मुस्लीम उमेदवार दिल्याचा आरोप होत असल्याबाबत मलिक म्हणाले की, आम्ही दिलेले उमेदवार केवळ मुस्लीम बहुल भागात नाहीत. मदनपुरा मध्ये उमेदवार दिलेला नाही. भेंडी बाजारात केवळ एक उमेदवार दिला आहे. पक्षाचे संघटन जिथे आहे, तिथे उमेदवार दिले आहेत. स्वत:च्या कुटुंबातील तिघांना उमेदवारी दिल्याप्रकरणी मलिक म्हणाले, माझा भाऊ व बहिण दोघे २०१७ मध्ये नगरसेवक होते. त्यामुळे घरात उमेदवारी दिली या आरोपात तथ्य नाही. राष्ट्रवादीने सर्वाधिक उत्तर भारतीयांना उमेदवारी दिली आहे याकडे मलिकांनी लक्ष वेधले.

अजित पवारांची राष्ट्रवादी एकीकडे महायुतीमध्ये राज्यातील सत्ताधारी असून भाजपचा मित्रपक्षही आहे. दुसरीकडे मुंबईत मात्र या पक्षाने भाजपला ललकारले आहे. हे खरे आहे की सगळे कथानक भाजपच्या सोईचे होते, हे निवडणुकीच्या निकालानंतर स्पष्ट होईल.

३० पेक्षा अधिक जागा येतील – नवाब मलिक

मुंबईत वर्ष २००० पासून राष्ट्रवादी महानगरपाालिका निवडणुका लढवत आहे. राष्ट्रवादीला नगरसेवकांचा जेमतेम दुहेरी आकडा गाठता आला होता. . झारखंडमध्ये अपक्ष निवडून येणारा एकमेव आमदार (मधू कोडा) मुख्यमंत्री होऊ शकतो. मुंबईत यावेळी आमच्या ३० पेक्षा अधिक जागा जिंकून येतील आणि मुंबईचा महापौर राष्ट्रवादी काँग्रेसचा होईल आणि तो मुंबईकरच असेल, असा दावा नवाब मलिक यांनी केला.