मुंबई : आर्थिक गैरव्यवहार प्रकरणाशी संबंधित खटल्यात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) जप्त केलेली, परंतु खटल्यात पुरावा म्हणून सादर न केलेली कागदपत्रे मिळवण्याबाबतची राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांची याचिका प्रलंबित आहे. असे असताना त्यांच्यावर या प्रकरणी आरोपनिश्चिती कशी केली गेली ? असा प्रश्न मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी उपस्थित केला.
आरोप निश्चित करण्याच्या आर्थिक गैरव्यवहाराला प्रतिबंधक कायद्यांतर्गत (पीएमएलए) स्थापन विशेष न्यायालयाच्या निर्णयाला मलिक यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. मलिक यांच्या याचिकेनुसार, त्यांच्या बाजूने असलेली कागदपत्रे ईडीने लपवून ठेवल्याचे आरोपनिश्चितीपूर्वी विशेष न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आले होते. तसेच, ही जप्त केलेली सर्व कागदपत्रे सादर केली असती, तर मलिक यांच्यावर आरोप निश्चित करण्यास कोणताही आधार उरला नसता, असेही विशेष न्यायालयाला सांगण्यात आले होते, त्याचप्रमाणे या मुद्याचा निर्णय लागेपर्यंत आरोपनिश्चितीची प्रक्रिया पुढे ढकलण्याची विनंती करण्यात आली होती. मात्र, विशेष न्यायालयाने १८ नोव्हेंबर २०२५ रोजी मलिक आणि इतरांवर आरोप निश्चित करण्याची प्रक्रिया पुढे चालू ठेवली.
मलिक यांनी मागितलेली काही कागदपत्रे एप्रिल २०२५ मध्ये मुंबईतील फोर्ट परिसरातील ईडी कार्यालयाला लागलेल्या आगीत नष्ट झाली होती, असे तपास यंत्रणेतर्फे विशेष न्यायालयाला सांगण्यात आले होते. दुसरीकडे, कागदपत्रे मिळवण्याबाबतच्या मलिक यांच्या याचिकेवरील सुनावणीच्या वेळी उत्तर दाखल कण्यासाठी वेळ देण्याची मागणी ईडीच्या वतीने अतिरिक्त महान्यायअभिकर्त्यांनी विशेष न्यायालयाकडे केली होती. तसेच, खटला चालवणाऱ्या न्यायालयासमोर आरोप निश्चितीसाठी आग्रह धरला जाणार नाही, अशी हमीही तपास यंत्रणेने उच्च न्यायालयाला दिली होती. त्यानंतरही विशेष न्यायालयाने १८ नोव्हेंबर २०२५ रोजी कार्यवाही पुढे चालू ठेवली आणि मलिक व इतरांविरुद्ध आरोप निश्चित केले, असा दावाही मलिक यांनी आरोपनिश्चितीच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या सुधारित याचिकेत केला आहे.
न्यायमूर्ती मिलिंद जाधव यांच्या एकलपीठापुढे मलिक यांच्या याचिकेवर बुधवारी सुनावणी झाली. त्यावेळी, मलिक यांच्या वतीने प्रकरणाची माहिती न्यायालयाला दिली. त्याची दखल घेऊन कागदपत्रे मिळवण्याबाबतची याचिका प्रलंबित असताना विशेष न्यायालयाने मलिक यांच्यावर आरोपनिश्चिती कशी केली, त्यांनी मागितलेली कागदपत्रे आगीत नष्ट झाली, तर आता काय होईल, अशी विचारणा न्यायालयाने केली. त्यावर, ही कागदपत्रे न्यायालयीन कामकाजाचा भाग असून त्यामुळे ती उपलब्ध असू शकतात, असे मलिक यांच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितले. तसेच, ही कागदपत्रे ईडीचा खटला कमकुवत करू शकतो, असा दावा केला. न्यायालयाने उपरोक्त विचारणा करून प्रकरणाची सुनावणी ८ ऑक्टोबर रोजी ठेवली आहे.
