अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला ड्रग्ज प्रकरणामध्ये अटक केल्यानंतर याच प्रकरणावरुन सापडलेले अमली पदार्थ नियंत्रण विभागाचे (एनसीबी) विभागीय संचालक समीर वानखेडे आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्यामधील वाद मागील काही आठवड्यांपासून सुरु आहेत. त्यातच मलिक यांनी काही दिवसांपूर्वी समीर वानखेडे हे मुस्लिम असून त्यांनी मुस्लिम असल्याचं लपवून नोकरीसाठी कागदपत्रांचा गैरवापर केल्याचा आरोप केला. हे आरोप समीर वानखेडे आणि त्यांच्या कुटुंबियांनी फेटाळून लावल्यानंतर आता नवाब मलिक यांनी थेट समीर वानखेडेंचा निकाह नामाच ट्विट केला आहे. समीर हे मुस्लिम असल्याच्या आपल्या दाव्याला समर्थन करणारे ट्विट्स मलिक यांनी केले आहेत.

हा निकाह नामा समीर दाऊद वानखेडे यांच्या पहिल्या लग्नाचा असून त्यांनी डॉ. शबाना कुरेशी यांच्याशी निकाह केलेला असं निकाहनामा शेअर करताना नवाब मलिक यांनी म्हटलं आहे. या निकाह नाम्यामध्ये नवऱ्याचं नाव यापुढे समीर दाऊद वानखेडे असं लिहिलेलं दिसत आहे. तर त्या खाली नवरीचं नाव शबाना जाहीद कुरेशी असं लिहिलेलं आहे. तसेच मुलीच्या वडिलांचं नाव जाहीद कुरेशी असल्याचं या निकाह नाम्यावर लिहिल्याचं दिसत आहे. त्या खालोखाल दुसरा साक्षीदार म्हणून समीर यांची थोरली बहीण जास्मिन दाऊद वानखेडेंचे पती अजीज खानांनी यावी दुसरे साक्षीदार म्हणून स्वाक्षरी केल्याचा दावा नवाब मलिक यांनी केलाय.

गुरुवारी, ७ डिसेंबर २००८ रोजी रात्री आठ वाजता समीर दाऊद वानखेडे आणि शबाना कुरेशी यांचा निकाह अंधेरी पश्चिमधील लोखंडवाला कॉम्पलेक्स येथे झाला होता, असा दावा नवाब मलिक यांनी एका ट्विटमध्ये केलाय. तसेच मेहर म्हणून ३३ हजारांची रक्कम घेण्यात आली होती, असं नवाब मलिक म्हणाले आहेत. मलिक यांनी केलेल्या दाव्याप्रमाणे सर्व माहिती त्यांनी पोस्ट केलेल्या निकाहनाम्यामध्ये दिसत आहे.

याचप्रमाणे नवाब मलिक यांनी एक फोटो ही ट्विट केलाय. मलिक यांच्या दाव्यानुसार हा फोटो या निकाहमधील असून फोटो दिसणारी व्यक्ती समीर वानखेडे आणि त्यांची पहिली पत्नी डॉ. शबाना कुरेशी आहेत.

समीर वानखेडे मुस्लिम असल्याचा दावा आणि वानखेडेंचं उत्तर…
समीर वानखेडे हे जन्मापासून आजपर्यंत मुस्लिम असल्याचा दावाही मलिक यांनी काही दिवसांपूर्वी केलेला. मात्र समीर वानखेडे यांनी हा दावा खोडून काढला होता. ” माझे वडील ज्ञानदेव कचरुजी वानखेडे ३० जून २००७ रोजी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पुणे येथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून निवृत्त झाले. माझे वडील हिंदू आणि माझी आई स्वर्गीय श्रीमती झहीदा मुस्लिम होत्या. मी भारतीय परंपरेतील एक संमिश्र, बहुधर्मीय आणि धर्मनिरपेक्ष कुटुंबातील आहे आणि मला माझ्या वारशाचा अभिमान आहे,” असं समीर वानखेडे यांनी मलिक यांनी पहिल्यांदा फोटो ट्विट केला तेव्हा पत्रक जारी करत म्हटलं होतं.

वैवाहिक आयुष्याबद्दल वानखेडे म्हणाले होते…
“मी २००६ मध्ये विशेष विवाह कायदा १९५४ अंतर्गत नागरी विवाह समारंभात डॉ. शबाना कुरेशी यांच्याशी लग्न केले. २०१६ मध्ये विशेष विवाह कायद्याअंतर्गत आम्ही दोघांनी दिवाणी न्यायालयाद्वारे परस्पर घटस्फोट घेतला. २०१७ मध्ये मी क्रांती दीनानाथ रेडकर ह्यांच्याशी लग्न केले,” असं वानखेडे यांनी आपल्या वैवाहिक आयुष्याबद्दल बोलताना सांगितलं होतं.

आज मुंबईत चौकशी…
दरम्यान, मंगळवारी समीर वानखेडे यांनी दिल्लीतील ‘एनसीबी’च्या मुख्यालयात उपमहासंचालकांसमोर आपली बाजू मांडली. मात्र, वानखेडे यांच्यावर झालेल्या कथित लाचखोरीच्या आरोपाची चौकशी करण्यात येणार असून, त्यासाठी चार वरिष्ठ अधिकारी आज मुंबईत येणार आहेत. समीर वानखेडे यांच्या विभागीय चौकशीसाठी उपमहासंचालक ज्ञानेश्वर सिंग आणि त्यांचे विभागीय संचालक दर्जाचे तीन सहकारी आज दिल्लीहून मुंबईला जातील. हे अधिकारी या प्रकरणाचे साक्षीदार किरण गोसावी व प्रभाकर साईल या दोघांचीही चौकशी करणार आहेत.