…म्हणून समीर वानखेडेंनी पहिल्या पत्नीच्या भावाला ड्रग्ज प्रकरणात अडकवले; नवाब मलिकांचा गंभीर आरोप

वानखेडेंनी शेजारी असणाऱ्या एका आयपीएस अधिकाऱ्यासोबत वाद झाल्यानंतर त्यांच्या मुलाला खोट्या आरोपांमध्ये फसवण्याचे काम केले, असे मलिक म्हणाले

nawab malik press conference against sameer wankhede drugs case

केंद्रीय अमलीपदार्थ नियंत्रण विभागाचे (एनसीबी) विभागीय संचालक समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या दाव्याप्रकरणी आणखी काही कागदपत्रे सादर करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांनी उच्च न्यायालयात अर्ज केला आहे. त्यांच्या अर्जावर गुरुवारी सुनावणी होणार आहे. त्याआधी नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेत समीर वानखेडेंवर आणखी काही आरोप केले आहेत.

“समीर दाऊद वानखेडे यांचा खोटेपणा समोर येत आहे. शेजारी असणाऱ्या एका आयपीएस अधिकाऱ्यासोबत त्यांचा वाद झाल्यानंतर त्यांच्या मुलाला खोट्या आरोपांमध्ये फसवण्याचे काम केले. त्या अधिकाऱ्यांनी एनडीपीएस कोर्टामध्ये सीसीटीव्ही तपासण्याची मागणी केली होती. समीर वानखेडेंनी त्यांच्या मुलाला बोलावून घेतले. त्याला बोगस ड्रग्ज प्रकरणात अडकवले. ज्या मुलीला समीन वानखेडेंनी घटस्फोट दिला होता ती त्यांच्या विरोधात उभी राहण्याची त्यांना भीती होती. त्यामुळे त्या मुलीच्या भावाकडे एका तस्कराकडून ड्रग्ज ठेवण्यात आले आणि त्याला अटक करण्यात आली. समीर वानखेडेंनी माझ्याविरोधात तुम्ही उभे राहिलात तर संपूर्ण कुटुंबाला ड्रग्ज प्रकरणात तुरुंगात टाकण्याची धमकी दिली होती. मुलीच्या घरच्यांना घाबरवण्यात आले. पण हळूहळू सर्व बाहेर येत आहे,” असे आरोप नवाब मलिक यांनी केला.

“समीर वानखेडे यांच्या वडिलांनी माझ्याविरोधात मानहानीचा दावा कोर्टात दाखल केला आहे. त्यामध्ये नवाब मलिकांना ट्विट करण्यापासून आणि पत्रकार परिषद घेण्यापासून रोखण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे. हायकोर्टाच्या निष्कर्षानंतर आम्ही अधिक बारकाईने तपास केला. त्यानुसार शाळेच्या दाखल्यापासून अन्य कागपत्रे शोधून काढली. ते हायकोर्टासमोर ठेवण्यात आले आहेत. यासंदर्भात आज दुपारी सुनावणी होणार आहे,” असे नवाब मलिक यांनी म्हटले.

दरम्यान, नवाब मलिक यांनी गुरुवारी नवे कागदपत्रे सादर केली आहेत. सेंट जोसेफ हायस्कूल आणि सेंट पॉल हायस्कूलचे शाळा सोडल्याचे दाखले नवाब मलिकांनी समोर आणले. ही दोन्ही प्रमाणपत्रे समीर वानखेडे यांची आहेत. ज्यात त्यांचे पूर्ण नाव समीर दाऊद वानखेडे असे लिहिले आहे. समीर वानखेडे यांनी नवाब मलिक यांच्या आरोपांवर स्पष्टीकरण देणारे प्रमाणपत्र न्यायालयात सादर केले होते. ज्यामध्ये त्यांचे नाव समीर ज्ञानदेव वानखेडे असे लिहिले होते. त्याला प्रत्युत्तर म्हणून नवाब मलिक यांनी आता ही नवीन प्रमाणपत्रे दिली आहेत.

“समीर वानखेडे बनावट कागदपत्रे समोर आणत आहेत. पण त्यांनी जन्मदाखला समोर आणायला हवा होता. हे बनावट आहे आणि आम्ही हे सर्व न्यायालयासमोर ठेवले आहे. समीर वानखेडे बनावट कागदपत्रे दाखवत आहेत. जातपडताळणी अधिकाऱ्यांकडेही त्यांची तक्रार करण्यात आली आहे. त्यामुळे समीर वानखेडेंची नोकरी निश्चित जाणार आहे”, असे नवाब मलिक म्हणाले.

“वानखेडेंनी कागदपत्रांमध्ये खाडाखोड करुन १९९३ साली बनावट कागदपत्रे बनवली. तिथले रजिस्टरही गहाळ केले. पण ही कागदपत्रे स्कॅन करुन महापालिकेकडे आहेत हे यांना कळले नाही. ही कागदपत्रे मी न्यायालयाला दिले आहेत,” असे मलिक म्हणाले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Nawab malik press conference against sameer wankhede drugs case abn

Next Story
न्यायालयाचा ‘अंतिम’ आदेश नसल्याने शालेय बसवर अद्याप कारवाईचा बडगा नाही
ताज्या बातम्या