काही दिवस थंडावलेलं मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरण आता पुन्हा एकदा पेट घेताना दिसत आहे. राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी पुन्हा एकदा NCB चे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर आरोप करत नव्या प्रकरणाला तोंड फोडलं आहे. या प्रकरणात पूर्वी नमूद केलेल्या काशिफ खान आणि आता नव्याने समोर आलेल्या ‘व्हाईट दुबई’ अशा नावाच्या व्यक्तींवर कारवाई किंवा त्यांची चौकशी का झाली नाही? त्यांचे वानखेडेंशी काही संबंध आहेत का? असा सवाल मलिक यांनी उपस्थित केला आहे.

याबद्दल आज सकाळी झालेल्या पत्रकार परिषदेत माध्यमांशी बोलताना मलिक म्हणाले, “समीर वानखेडे विभागीय संचालक असताना गोवाही त्यांच्या अखत्यारित येतं. सगळ्या जगाला माहित आहे की गोव्यात ड्रग्जचा धंदा चालतो. पण तिकडे कोणतीच कारवाई होत नाही, कारण काशिफ खानच्या माध्यमातून सगळं रॅकेट गोव्यात चालवलं जातं. काशिफ खान आणि वानखेडेंचे घनिष्ट संबंध आहेत. म्हणून त्याच्यावर कारवाई होत नाही. मी NCB च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना विचारू इच्छितो,तुम्ही काशिफ खानला चौकशीसाठी का बोलावलं नाही”.

हेही वाचा – Drugs on Cruise: “…अशी सुरु होती बड्यांना अडकवण्याची तयारी!”, Whatsapp चॅट शेअर करत मलिकांचा वानखेडेंवर निशाणा

‘व्हाईट दुबई’चा उल्लेख करत नवाब मलिक म्हणाले, “काशिफ खानसोबत आणखी एक नाव आहे, ते म्हणजे व्हाईट दुबई. हे त्याचं कोड नेम आहे. त्याच्याबाबतीतही माहिती देण्यात आली होती. त्याला का अटक झाली नाही? आणि कुठे ना कुठे काशिफ खान आणि समीर वानखेडे यांच्यात काय संबंध आहेत याची माहिती NCB ने द्यावी आणि काशिफ हा व्यक्ती देशभरात त्याच्यावर वेगवेगळे गुन्हे आहेत. चार दिवसांपूर्वी त्याच्यावर फसवणुकीचा गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. एका कोर्टाने त्याला फरार घोषित केलं आहे. इतकं असताना त्याला का वाचवलं जात आहे, याचं उत्तर आम्हाला या यंत्रणेकडून हवं आहे”.