scorecardresearch

फडणवीसांचा दूत बनून नीरज गुंडे उद्धव ठाकरेंना मांडवलीसाठी भेटायचा – नवाब मलिक

महाराष्ट्राचे अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केलेत.

फडणवीसांचा दूत बनून नीरज गुंडे उद्धव ठाकरेंना मांडवलीसाठी भेटायचा – नवाब मलिक

महाराष्ट्राचे अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केलेत. नीरज गुंडे ड्रग्ज व्यवसायिक असून तो फडणवीस सरकारच्या काळात वाद झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांचा दूत बनून उद्धव ठाकरेंना मांडवलीसाठी भेटायचा, असा आरोप नवाब मलिक यांनी केलाय. ते मुंबईत पत्रकार परिषदेच बोलत होते.

नवाब मलिक म्हणाले, “फडणवीस सरकारच्या काळात नीरज गुंडे देवेंद्र फडणवीस यांचा दूत म्हणून उद्धव ठाकरेंना मांडवलीसाठी भेटायचा. सरकार सुरू असताना फडणवीस आणि ठाकरेंचे नाते बिघडत होते. त्यावेळी नीरज गुंडे फडणवीसांचे निरोप घेऊन उद्धव ठाकरेंकडे मांडवली करण्यासाठी जायचा. महाविकास आघाडीचं सरकार स्थापन होत असतानाही गुंडे भाजपा आणि शिवसेना सोबत यावी यासाठी प्रयत्न करत होता. गुंडेचा उद्धव ठाकरेंशी काहीही संबंध नाही.”

“महाराष्ट्रात नीरज गुंडेच्या माध्यमातून फडणवीसांकडून वसुली”

“हे प्रकरण महाराष्ट्रातील मोठ्या ड्रग्ज व्यवसायाचं आहे. देवेंद्र फडणवीस यांचा एक वजीर याच शहरात राहतो. त्याचं नाव निरीज गुंडे असं आहे. फडणवीस सरकारच्या काळात त्याला मुख्यमंत्री निवास, मुख्यमंत्री कार्यालयात, सर्व अधिकाऱ्यांच्या कार्यालयात प्रवेश होता. सर्व पोलिसांच्या बदल्या तो ठरवत होता. प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या देखील तोच ठरवायचा. महाराष्ट्रात त्याच्याच माध्यमातून वसुली केली जायची,” असा आरोप नवाब मलिक यांनी केला.

“केंद्रीय तपास संस्थांच्या कार्यालयात देवेंद्र फडणवीस यांचा वाझे फिरताना दिसतोय”

नवाब मलिक यांनी फडणवीस सरकारच्या काळातील बदल्यांवरही गंभीर आरोप केलेत. ते म्हणाले, “देवेंद्र फडणवीस नवी मुंबई किंवा पुण्याला जायचे तेव्हा सायंकाळी त्यांच्या घरी हजेरी लागायची. फडणवीस सातत्याने नीरज गुंडेच्या घरी बसायचे. तिथूनच देवेंद्र फडणवीसांचं मायाजाल चालायचं. सरकार बदलल्यानंतर महाराष्ट्रात ईडी, सीबीआय, आयकर किंवा एनसीबी अशा सर्व केंद्रीय तपास संस्थांच्या कार्यालयात देवेंद्र फडणवीस यांचा वाझे फिरताना दिसत आहे. अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये कोट्यावधी रुपये वसूल केले जात आहेत.”

“महाराष्ट्रातील सर्व ड्रग्जचा खेळ देवेंद्र फडणवीस यांच्या इशाऱ्यावर चालतो”

“समीन वानखेडे मागील १४ वर्षांपासून मुंबईत वेगवेगळ्या विभागांमध्ये काम करत आहेत. त्यांच्या बदल्या करण्यात महाराषट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. त्यांना प्रसिद्धी मिळवत लोकांना फसवण्यासाठीच एनसीबीच्या कार्यालयात आणण्यात आलं. ड्रग्जचा खेळ मुंबई आणि गोव्यात सुरू राहावा म्हणून समीर वानखेडे यांना आणण्यात आलं. काशिफ खान सारखे मोठमोठ्या ड्रग पेडलरला सोडून देण्यात येतं. ऋषभ सचदेवा, आमीर फर्नीचरवाला, प्रतिक गाबा यांना सोडून देण्यात येतं. महाराष्ट्रातील सर्व ड्रग्जचा खेळ देवेंद्र फडणवीस यांच्या इशाऱ्यावर चालतो,” असा आरोप नवाब मलिक यांनी केला.

प्रतिक गाबा कोण आहे?

नवाब मलिक यांनी प्रतिक गाबावर गंभीर आरोप केलेत. ते म्हणाले, “जबाबदारीनं सांगतो, प्रतिक गाबा कोण आहे? प्रतिक गाबाला का सोडून देण्यात आलं, तो मुंबईत कोणत्या हॉटेल्समध्ये पार्टी आयोजित करतो, एका टेबलची किंमत ५,१०,१५ लाख रुपये कशी असते? मी आज प्रतिक गाबाविषयी सांगणार नाही. मात्र, या खेळात प्रतिक गाबा सर्वात मोठ्या भूमिकेत आहे. आगामी काळात आम्ही त्याच्या विषयीची माहिती माध्यमांसमोर ठेऊ.”

हेही वाचा : कॉर्डेलिया क्रूझवरील पार्टीतील व्हिडीओ नवाब मलिकांनी केला शेअर; म्हणाले…

“संपूर्ण ड्रग्ज रॅकेटचा मास्टरमाईंड महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत का? असा प्रश्न आमच्या डोक्यात उपस्थित होतोय. नीरज गुंडे जाऊन बसतो, भाजपाचे लोक का सुटतात? यावर आम्हाला माहिती नाही असं फडणवीस म्हणू शकत नाही. त्यांना माहिती होतं. तुमच्या नाकाखाली ड्रग्जचा धंदा सुरू होता. पुढील काळात आणखी ड्रग पेडलरचे फोटो समोर आणू. ते भाजपात होते आणि अजूनही आहेत. हळूहळू सर्व गोष्टी समोर आणणार,” असंही मलिक यांनी नमूद केलं.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या