राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी गेल्या काही महिन्यांपासून मुंबई एनसीबी आणि विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्याविरोधात जोरदार मोहीम उघडली आहे. आर्यन खान प्रकरणावरून नवाब मलिक यांनी एनसीबीवर अनेक गंभीर आरोप केल्यानंतर समीर वानखेडे आणि त्यांच्या कुटुंबीयांवर देखील नवाब मलिक यांनी ड्रग्ज रॅकेटमध्ये सहभागी असल्याचे आरोप केले. यानंतर आता मुंबईत घडलेल्या एका धक्कादायक प्रकारावरून नवाब मलिक यांनी पुन्हा एकदा मुंबई एनसीबीवर निशाणा साधला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नेमकं झालं काय?

तीन दिवसांपूर्वी २३ डिसेंबर रोजी मुंबईच्या ओशिवरा पोलीस स्थानकाच्या हद्दीत राहणाऱ्या एका भोजपुरी अभिनेत्रीने आत्महत्या केल्याची घटना समोर आली होती. या २८ वर्षीय अभिनेत्रीने तिच्या घरातून दुसऱ्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केल्याचं स्पष्ट झालं होतं. या प्रकरणाच्या तपासानंतर धक्कादायक खुलासा समोर आला आहे. सूरज परदेशी आणि प्रविण वाळिंबे या दोन्ही तोतयांना एनसीबी अधिकारी असल्याचं भासवून तिला एका पार्टीमधून अटक केली होती. ड्रग्ज प्रकरणात अडकवण्याची भिती घालून ४० लाखांच्या खंडणीची मागणी केली. २० लाखांवर सेटलमेंट देखील केली. मात्र, पैशांची मागणी करणाऱ्या दोघांच्या त्रासाला कंटाळून नैराश्यातून तिने आत्महत्येचं टोकाचं पाऊल उचलल्याचं स्पष्ट झालं आहे. पोलिसांनी या दोन्ही तोतयांना अटक केली आहे.

“गोसावी, भानुशाली सापडले, पण..”

दरम्यान, या प्रकरणावरून नवाब मलिक यांनी एनसीबीवर निशाणा साधला आहे. “तपासातून समोर आलंय की काही लोक एनसीबीचे बनावट अधिकारी बनून त्या अभिनेत्रीला धमकावून पैसे घेत होते. बदनामीच्या भितीने त्या मुलीने आत्महत्या केली आहे. नक्कीच एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी मुंबईत प्रायव्हेट आर्मी बनवली होती. त्या माध्यमातून वसुलीचा धंदा सुरू होता. गोसावी, भानुशालीसारख्या लोकांचा पर्दाफाश झाला आहे. पण अजूनही काही लोक या आर्मीत आहेत हे आम्ही सांगितलं होतं. या प्रकरणात देखील प्रायव्हेट आर्मीचा अँगल तपासून पाहायला हवा. नक्कीच एनसीबीच्या नावावर प्रायव्हेट आर्मी मुंबईत खंडणी उकळण्याचं काम करत आहे”, असं नवाब मलिक म्हणाले आहेत.

मुंबई : एनसीबी अधिकारी असल्याचे सांगत मागितली खंडणी; कारवाईच्या भीतीने अभिनेत्रीची आत्महत्या

दोघांना अटक, गुन्हा दाखल

या प्रकरणी सूरज परदेशी (३२) आणि प्रवीण वळिंबे (२८) यांना एनसीबीचे अधिकारी असल्याचे भासल्याचे दाखवल्याच्या कारणावरून अटक करण्यात आली. काझी आणि अन्य आरोपी सापडत नसल्याचे पोलिसांनी सांगितले. आयपीसीच्या कलम ३०६ १७०, ४२०, ३४४, ३८८, ३८९, ५०६, १२०(ब) अंतर्गत तोतया एनसीबी अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nawab malik targets mumbai ncb bhojpuri actress suicide case fake officer extortion pmw
First published on: 26-12-2021 at 14:26 IST