मुंबई : अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यनसह सहा जणांविरोधात पुरेसे पुरावे नसल्याचे स्पष्ट करीत केंद्रीय अमली पदार्थ नियंत्रण विभागाने (एनसीबी) शुक्रवारी त्यांच्यावरील आरोप रद्द केले.  गेल्या काही वर्षांत हिंदी चित्रसृष्टीतील तारांकितांपासून ते सहकलाकारांविरोधात ‘एनसीबी’ने केलेल्या अनेक कारवाया फोल ठरल्या, त्यात आर्यन खान निमित्ताने आणखी एकाची भर पडली आहे.

क्रुझवरील अमली पदार्थ पार्टी प्रकरणात पुरेशा पुराव्यांअभावी आर्यन खानसह अवीन शाहू, गोपाल जी. आनंद, समीर सैघन, भास्कर अरोरा आणि मानव सिंघा यांच्यावरील आरोप एनसीबीने मागे घेतले आहेत. दिल्ली एनसीबीच्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) मुंबईतील विशेष न्यायालयात या प्रकरणी सहा हजार पानांचे आरोपपत्र दाखल केले. त्यात ‘एसआयटी’ने २० पैकी १४ आरोपींवर दोषारोप ठेवले आहेत, तर आर्यनसह सहाजणांवर पुराव्याअभावी कारवाई केली जात नसल्याचे स्पष्ट केले.

‘एसआयटी’ने वस्तुनिष्ठ पद्धतीने तपास केला. केवळ साशंकतेच्या पलीकडे ठोस पुरावे मिळवण्याच्या तत्त्वाचा वापर या प्रकरणाचा तपास करताना केला गेला. क्रुझवर छापा टाकण्यात आला तेव्हा आर्यन आणि अन्य काहीजण वगळता उर्वरित आरोपींकडे अमली पदार्थ सापडले, असेही एनसीबीने म्हटले आहे. एसआयटीने केलेल्या तपासाच्या आधारे १४ जणांविरोधात अमली पदार्थ प्रतिबंध कायद्याच्या विविध कलमांतर्गत तक्रार दाखल करण्यात आली आहे, तर आर्यनसह सहाजणांविरोधात पुरेशा पुराव्याअभावी तक्रार दाखल केली गेलेली नाही, असे एनसीबीने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल केल्यानंतर ‘एनसीबी’ने प्रसिद्धीपत्रक प्रसिद्ध केले.

‘एसआयटी’च्या तपासाच्या पुनरावलोकनात ‘एनसीबी’चे माजी विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यासह छाप्यात सहभागी झालेले एनसीबीच्या मुंबई विभागातील अधिकारी, अटकेतील सर्व आरोपी आणि साक्षीदारांची चौकशी करण्यात आली. आर्यनने त्याचा मित्र अरबाज र्मचटला कधीच क्रुझवर अमली पदार्थ आणण्यास सांगितले नव्हते, हे स्पष्ट झाले. वेगळय़ा दक्षता चौकशीचा भाग म्हणून प्रक्रियात्मक त्रुटींकडे लक्ष दिले जात आहे, असेही ‘एसआयटी’ने म्हटले आहे.

आर्यनच्या मोबाइल फोनमधील व्हॉट्सअ‍ॅप चॅटमध्ये ‘काहीही आक्षेपार्ह’ नाही. शिवाय आर्यनसह सहआरोपी अरबाज र्मचट आणि मुनमुन धमेचा यांनी, अमली पदार्थाशी संबंधित गुन्हा करण्याचा कट रचल्याचे सिद्ध करणारा कोणताही पुरावा नसल्याचे नमूद करून उच्च न्यायालयाने आर्यनसह तिघांना सशर्त जामीनही मंजूर केला होता. उच्च न्यायालयाने आर्यनला जामीन देताना नोंदवलेल्या निरीक्षणानंतरच ‘एनसीबी’ने मुंबई विभागाकडून तपास काढून घेत तो दिल्ली विभागाच्या ‘एसआयटी’कडे सोपवला होता.

आर्यन २६ दिवस अटकेत होता. न्यायालयीन कोठडी मिळताच त्याने जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र या अर्जावर केवळ सत्र न्यायालयातच सुनावणी होऊ शकते, असे अतिरिक्त मुख्य महानगरदंडाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले होते. त्यानंतर आर्यनने विशेष न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला. विशेष न्यायालयाने आर्यनचा सहभाग सकृतदर्शनी दिसून येत असल्याचे नमूद करून जामीन अर्ज फेटाळला होता. त्याला आर्यनने उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. अखेर त्याला उच्च न्यायालयाने जामीन दिला होता.

वाढीव मुदतीत आरोपपत्र

अब्दुल कादर आणि नायजेरियन नागरिक चिनेदू इग्वे हे दोन कथित अमली पदार्थ तस्कर वगळता या प्रकरणातील अन्य आरोपी जामिनावर आहेत. या प्रकरणी आरोपपत्र दाखल करण्याची मुदत २ एप्रिल रोजी संपली. मार्चमध्ये विशेष न्यायालयाचे न्यायाधीश व्ही. व्ही. पाटील यांनी एसआयटीला आरोपपत्र सादर करण्यासाठी अतिरिक्त ६० दिवसांची मुदत दिली होती.

आरोप काय होते?

एनसीबीने २ ऑक्टोबर २०२१ रोजी मुंबईहून गोव्याला क्रुझवर छापा टाकून आर्यनला अटक केली होती. अमली पदार्थाचे सेवन करण्याचा प्रयत्न करणे, ते बाळगणे, बागळण्यासाठी प्रवृत्त करणे आणि अमली पदार्थ प्रतिबंध कायद्याअंतर्गत कट रचल्याच्या आरोपाअंतर्गत आर्यनला अटक केली होती. आरोपींकडून १३ ग्रॅम कोकेन, पाच ग्रॅम मेफ्रेडोन एमडी, २१ ग्रॅम चरस आणि एमडीएमए एक्स्टसीच्या २२ गोळय़ा जप्त केल्याचा दावाही एनसीबीने केला होता.

एसआयटी तपासातील निष्कर्ष..

  • आर्यन खानसह सहा जण पुरेशा पुराव्यांअभावी आरोपमुक्त. 
  • एसआयटी तपासाच्या आधारे १४ जणांविरोधात मात्र तक्रार दाखल.
  • क्रुझवरील छाप्यात आर्यन आणि अन्य काही जणांकडे अमली पदार्थ नव्हते.
  • आर्यनने अरबाज र्मचटला क्रुझवर अमली पदार्थ आणण्यास सांगितलेले नाही. 
  • एसआयटी चौकशीत साशंकतेच्या पलीकडे जाऊन ठोस पुरावे मिळवण्याच्या तत्त्वाचा वापर.

कारवाई केली, पुढे काय?

  • एनसीबीने गेल्यावर्षी दीपिका पदुकोण, सारा अली खान, श्रद्धा कपूर आणि रकुल प्रीत सिंग यांच्यासह अनेक कलाकारांची अंमलपदार्थ प्रकरणात चौकशी केली होती. पण पुढे त्याच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही.
  • रिया चक्रवर्ती : अभिनेता सुशांत सिंह राजपुतला अमलीपदार्थ दिल्याच्या आरोपाखाली अभिनेत्री रिया चक्रवर्ती व तिचा भाऊ शौविक यांना अटक, सध्या ते जामिनावर.
  • प्रीतिका चौहान : ९९ ग्रॅम गांजा बाळगल्याप्रकरणी ऑक्टोबर २०२० मध्ये वर्सोवा येथून अटक. सध्या जामिनावर.
  • भारती सिंग : नोव्हेंबर २०२० मध्ये, भारतीचा पती विनोदी कलावंत हर्ष लिंबाचिया याला घरी गांजा सापडल्याप्रकरणी अटक, नंतर जामीन मंजूर. 
  • शबाना सईद : फिरोज नाडियाडवाला यांच्या घरावर नोव्हेंबर २०२० मध्ये छापा, १० ग्रॅम गांजा सापडल्यानंतर त्यांच्या पत्नीला अटक, नंतर जामीन. 
  • अरमान कोहली : कोहलीला ऑगस्ट २०२१ मध्ये अटक, घरातून १.२ ग्रॅम कोकेन जप्त. 
  • फरदीन खान : कोकेन खरेदी करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी ५ मे २००१ रोजी अटक. २०१२ मध्ये खटल्यातून आरोपमुक्तता.