देशात सोन्याच्या तस्करीचे प्रमाण वाढले आहे. सोन्याची तस्करी करण्यासाठी तस्कर विविध शक्कल लढवत असतात. मात्र, गुप्तांगातून सोन्याची तस्करी केल्याचा धक्कादायक प्रकार मुंबईतून समोर आला आहे. सोन्याची तस्करी केल्याप्रकरणी मुंबई विमानतळ टर्मिनल २ वरून घाना येथील तीन महिलांना अटक करण्यात आली आहे. नार्कोटिक कंट्रोल ब्युरोने ही कारवाई केली. या महिलांनी त्यांच्या शरीरात ५ किलो सोन्याची बिस्किटे लपवली होती. आरोपी महिलांनी त्यांच्या खाजगी भागातून सोनं शरीरात टाकलं, असा संशय एनसीबी अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

बुधवारी, १८ ऑगस्ट रोजी तीन महिला दुबईहून मुंबईत आल्या. या महिलांवर संशय आल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली होती. चौकशीदरम्यान, महिलांनी जवळ सोनं असल्याचं मान्य केलं नाही. त्यामुळे एनसीबीचे अधिकारी त्यांना जेजे रुग्णालयात घेऊन गेले आणि त्यांचे एक्सरे काढण्यात आले. या तिघींकडे एकूण पाच किलो सोनं असल्याचं एक्सरे काढल्यानंतर निष्पन्न झालं. दरम्यान, या महिलांनी स्वतःच्या शरीरात जवळपास दीड ते दोन किलो सोनं कसं टाकलं, याबाबत विचारणा करण्यात आली. या महिलांनी गुप्तांगातून सोन्याची बिस्किटे शरीरात टाक़ल्याचा संशय अधिकाऱ्यांना आहे.

दरम्यान, या महिलांच्या शरीरात लपवलेली सोन्याची बिस्किटे कशी काढायची, याबाबत एनसीबीचे अधिकारी वैद्यकीय सल्ला घेत आहेत. सोनं शरीरातून काढण्याच्या प्रक्रियेमध्ये धोका असल्याने त्यांची वैद्यकीय तपासणी करून डॉक्टरांच्या देखरेखीखाली ते सोनं काढण्यात येईल. त्यानंतर पोलिसांकडून या महिलांना अटक केली जाईल, असे एनसीबी अधिकाऱ्यांनी सांगितले.