बॉलिवूड ड्रग्ज प्रकरणात निर्माता करण जोहरला एनसीबीने समन्स बजावलं आहे. याआधीही अनेक बड्या कलाकारांना ड्रग्ज प्रकरणात समन्स बजावण्यात आलं होतं. ज्यामध्ये दीपिका पदुकोण, सारा अली खान यांसारख्या अभिनेत्रींचाही समावेश होता. आता करण जोहरला समन्स बजावलं गेल्यानंतर त्याच्या अडचणीही वाढण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी एनसीबीने ड्रग्ज प्रकरणात अभिनेता अर्जुन रामपाललाही समन्स बजावलं होतं. गेल्या काही महिन्यांपासून एनसीबी बॉलिवूडशी असलेल्या ड्रग्ज कनेक्शनचा तपास करते आहे. या प्रकरणात एनसीबीला आता करण जोहरकडून माहिती हवी आहे.

करण जोहरचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या संदर्भात एनसीबीकडे एक तक्रार आली आहे. ज्यानंतर एनसीबीने ही कारवाई केली आहे.  सूत्रांच्या माहितीनुसार करण जोहरला या समन्सला उत्तर देण्यासाठी निश्चित कालावधी देण्यात आलेला नाही. पण करण जोहरने ड्रग्ज प्रकरणाच्या चौकशीत एनसीबीला सहकार्य करावे अशी अपेक्षा असल्याचं यामध्ये म्हटलं आहे.

बॉलिवूड ड्रग्ज प्रकरणात एनसीबीने आत्तापर्यंत ३० पेक्षा जास्त जणांना अटक केली आहे. तसंच रिया चक्रवर्ती, शौविक चक्रवर्ती, दीपिका पदुकोण, सारा अली खान, श्रद्धा कपूर, फिरोज नाडियादवाला, भारती सिंह आणि तिचा नवरा हर्ष लिंबाचिया, अर्जुन रामपाल यांसारख्या बड्या कलाकारांची चौकशी केली आहे. आता या प्रकरणात एनसीबीला करण जोहरकडून माहिती हवी आहे आणि त्याने यासाठी सहकार्य करावं असंही एनसीबीने स्पष्ट केलं आहे.

अभिनेता सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या केल्यानंतर बॉलिवूडचं ड्रग्ज कनेक्शन समोर आलं होतं. या प्रकरणात रिया चक्रवर्तीला अटकही झाली होती. मात्र ७ ऑक्टोबरला तिला जामीन मंजूर करण्यात आला. आता ड्रग्ज प्रकरणात करण जोहरची चौकशी झाल्यानंतर त्यातून काय सत्य बाहेर येणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.