मुंबई : राष्ट्रीय शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (एनसीईआरटी) पुस्तकात मराठा साम्राज्याचा नकाशा छापण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्यात येईल, अशी माहिती शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी दिली.
एनसीईआरटीच्या वतीने सीबीएससी मंडळाची क्रमिक पुस्तके तयार केली जातात. या पुस्तकातून मराठा साम्राज्याचा नकाशा वगळण्यात आला आहे. त्या नकाशाचा पुन्हा समावेश करण्यात यावा, अशी मागणी सतेज पाटील यांनी नियम ९३ अन्वये चर्चा करताना केली. त्याला उत्तर देताना भोयर यांनी एनसीईआरटीच्या पुस्तकात अगोदर छत्रपती शिवाजी महाराजांचा अडीच पानांचा इतिहास होता, तो आता बावीस पानांचा करण्यात आला आहे, असे जुनी माहिती देण्याचा प्रयत्न केल्यामुळे विरोधी बाकावरील सदस्य आक्रमक झाले. सभागृहात घोषणाबाजी सुरू झाली. विरोधकांच्या घोषणाबाजीला सत्ताधाऱ्यांनी घोषणाबाजीने उत्तर दिल्यामुळे सभागृहात गोंधळ उडाला.
एनसीईआरटीच्या इंग्रजी माध्यमाच्या पुस्तकात मराठा साम्राज्याचा नकाशा आहे. हिंदी आणि उर्दू माध्यमांच्या पुस्तकात नाकाशा नाही. त्याचा समावेश करण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्यात येईल, अशी ग्वाही दिली. नऊ तारखेला केंद्र सरकारला पत्र पाठविले आहे, असे मोघम उत्तर दिल्यामुळे नऊ फेब्रुवारी की, मार्च असा सवाल करीत विरोधकांनी भोयर यांची कोंडी केली. अखेर आज, नऊ मार्च रोजी केंद्राला पत्र पाठविले आहे. या प्रश्नी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्यात येईल, अशी ग्वाही भोयर यांनी दिली.
