मुंबई : पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये संघर्ष सुरू असल्याची माहिती रोज समोर येत आहे. आमदारांना यासंदर्भात पक्षाकडून काहीही सांगितले जात नाही. पण, या संघर्षामुळे पक्ष बदनाम होत असून कमजोरही होत आहे, अशी कैफीयत राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार) आमदारांनी पक्षाच्या आठवडा बैठकीत मांडली. पक्षाध्यक्ष सुनेत्रा पवार यांच्या देवगिरी या शासकीय निवासस्थानी मंगळवारी रात्री राष्ट्रवादीच्या आमदार व खासदारांची बैठक पार पडली.

बैठकीला पक्षाध्यक्षा सुनेत्रा पवार, प्रफुल्ल पटेल, सुनिल तटकरे, छगन भुजबळ, नरहरी झिरवाळ, धनंजय मुंडे, इंद्रनील नाईक, झिशान सिद्दीकी, दिलीप वळसे पाटील, सना मलिक, शेखर निकम, सरोज अहिरे, दत्ता भरणे, सुनिल शेळके आदी ३२ आमदार व मंत्री उपस्थित होते. दिवाळीमुळे आमदारांची उपस्थिती कमी होती. राज्यात यंदा मोठा दुष्काळ पडला आहे. दुष्काळी उपाययोजनांच्या कामावर लोकप्रतिनिधींनी लक्ष ठेवावे. तसेच या कामाचा पाठपुरावा करावा. दुष्काळी भागात दौरे काढून जनतेला दिलासा द्यावा, अशी सूचना पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी बैठकीत केली.

आपला पक्ष सत्तेत आहे, मात्र आमची कामे होत नाहीत. खास करून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे जे विभाग आहेत, तिथे आमची अडवणूक होते, अशी तक्रार काही आमदारांनी मांडली. एका माजी मंत्र्याने भाजपकडे असलेल्या वित्त विभागाचा विषय छेडला. वित्त विभाग राष्ट्रवादीच्या वाट्याचा आहे, तो जोपर्यंत आपल्या पक्षाकडे येत नाही, तोपर्यंत आपल्या आमदारांना पुरेसा निधी मिळणार नाही, असा मुद्दा मांडला. भाजपच्या नेतृत्वाने वित्त विभाग परत देण्यासंदर्भात राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाला काय आश्वासन दिले, याची माहिती आम्हाला द्या, अशी मागणी आमदारांनी या बैठकीत केली.

पक्षाध्यक्ष अजित पवार हयात असताना दर मंगळवारी पक्षाच्या आमदार व खासदारांची बैठक मुंबईत होत असे. त्याप्रमाणे आजची बैठक होती. मात्र राष्ट्रवादीचे शिष्टमंडळ रविवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना दिल्लीत भेटले. पक्षाध्यक्ष सुनेत्रा पवार यांच्या अनुपस्थितीत झालेल्या या भेटीमुळे राष्ट्रवादीतील गोंधळ समोर आला आहे. त्याच दिवशी रात्री पक्षाच्या गाभा समितीची बैठक मुंबईत झाली. ती बैठकही वादळी ठरली पक्षांमध्ये पार्थ पवार आपल्या कलाने निर्णय घेत असल्याचा मुद्दा या बैठकीत समोर आला होता. त्या पार्श्वभूमीवर आज पक्षाच्या आमदार व खासदारांच्या बैठकीचे आयोजन केल्याने या बैठकीकडे सर्वांचे लक्ष होते.

एकूण राष्ट्रवादी काँग्रेसमधील तणाव आणि मतभेद संपण्याचे नाव घेत नाही. पक्षातील बुजुर्ग आणि तरुण नेतृत्वामधील दुफळी स्पष्ट झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भाजपचे नेतृत्व चालवतो आहे, यावरही या आठवड्यात घडलेल्या घडामोडींनी शिक्कामोर्तब केले आहे.