मुंबई : विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाची पाटी कोरी राहिली. पुण्याच्या जागेवरील दावाच पक्षाने सोडून दिला तर औरंगाबादमध्ये पक्षाला पराभवाचा धक्का बसला. विधान परिषदेच्या मावळत्या पाच जागांपैकी राष्ट्रवादीकडे पुणे व औरंगाबाद पदवीधर अशा दोन जागा होत्या. महायुतीच्या जागावाटपात राष्ट्रवादीने पुण्याच्या जागेवरील दावाच भाजपसाठी सोडून दिला. यावरून पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी नेतृत्वाला जबाबदार धरले होते. औरंगाबादची जागा राष्ट्रवादीने लढवली. पण पक्षात निवडणुकीबाबत काहीच चर्चा झाली नाही. कोणाला विश्वासात घेण्यात आले नाही. अशा निवडणुकांमध्ये पक्षाचे मंत्री, नेतेमंडळींवर काही जबाबदारी सोपिवण्यात येते. पण औरंगाबादमध्ये पक्षाचे उमेदवार व विद्यमान आमदार सतीश चव्हाण यांच्या निवडणुकीबाबत पक्षात काहीच चर्चा झाली नव्हती, असे पक्षाच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले.
औरंगाबादमध्ये पक्षाचा पराभव झाला. सतीश चव्हाण यांच्या उमेदवारीबाबत पक्षात कोणाची मतेही विचारात घेण्यात आली नव्हती. विधानसभा निवडणूक सतीश चव्हाण यांनी शरद पवार गटाकडून लढविली होती. पराभवानंतर त्यांनी पुन्हा अजित पवार गटात प्रवेश केला होता. १८ वर्षे आमदार असलेल्या चव्हाण यांचा या निवडणुकीत पराभव झाला. अजित पवार गटाची पाटी कोरी राहिली असताना शरद पवार गटाने दोन जागा जिंकल्या ही बाब अजित पवार गटाच्या नेत्यांना जास्तच जिव्हारी लागली. शरद पवार गटाची ताकद वाढणे हे अजित पवार गटासाठी धोक्याचा इशारा आहे. अजित पवार गटातील पक्षांतर्गत वाद पराकोटीला गेले आहेत. पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल हे सातत्याने उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार व खासदार पार्थ पवार यांना लक्ष्य करीत आहेत. दुसरीकडे, पार्थ पवार हे पटेल व तटकरे यांच्या खच्चीकरणाचा प्रयत्न करीत आहेत. या वादात पक्षाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
पुण्याच्या जागेवर राष्ट्रवादीने दावा करणे अपेक्षित होते. पण त्याबाबत पक्षात काही चर्चाही झाली नाही. भाजपने परस्पर उमेदवार जाहीर केला. राष्ट्रवादीला फार काही किंमतही दिली नाही. पक्षांतर्गत वाद त्यातच पक्षाची अशीच घसरण होत राहिल्यास पक्षात फूट पडण्याची भीती व्यक्त केली जाते. काही नेते आताच भाजपमध्ये जाण्याची भाषा करू लागले आहेत. अजित पवार यांच्या पश्चात पक्षाचे अस्तित्वच जाणवत नाही. गेल्या नऊ महिन्यांत एखाद दुसरा अपवाद वगळल्यास पक्षाची बैठक किंवा मोठे मेळावेही झालेली नाहीत.
विधान परिषद निवडणुकीत शरद पवार गटाने सर्वाधिक दोन जागा जिंकल्या. भाजप, काँग्रेस व शिवसेना शिंदे गटाने प्रत्येकी एक जागा जिंकली. अजित पवार गटाने दोन आमदार असताना फक्त एक जागा लढवली व त्यातही दारुण पराभव झाला. यामुळेच पक्ष संघटनेत सुधारणा करण्याकरिता तातडीने आणि कठोर आत्मपरीक्षण करावे लागेल, असा सल्ला प्रफुल्ल पटेल यांनी दिला आहे.
