मुंबई : राज्यात प्रलंबित असलेल्या २२ जिल्हा परिषदांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बूथ स्तरापर्यंत कार्यकर्त्यांना संघटित करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार) गाभा समितीच्या सोमवारी पार पडलेल्या बैठकीत आराखडा तयार करण्यात आला. तसेच तरुणाईला (जेन-झी) पक्षाशी जोडण्यासाठी व्यापक कार्यक्रम घेऊन जनतेत जाण्याचा तसेच पक्षाच्या संघटनात्मक बांधणीवर अधिक लक्ष केंद्रीत करण्याचा निर्णय या बैठकीत झाला.

पक्षाध्यक्ष सुनेत्रा पवार यांच्या ‘देवगिरी’ या शासकीय निवासस्थानी बैठक पार पडली. २७ सप्टेंबर रोजी नाशिक येथे पक्षाचे एक दिवसीय राज्यव्यापी शिबीर घेतले जाणार आहे. या शिबिरामध्ये नेते, कार्यकर्ते, जिल्हाध्यक्ष असे सुमारे ७०० पदाधारी सहभागी होतील.

पक्षाचे ज्येष्ठ नेते आमदार दिलीप वळसे पाटील यांच्यावर जिल्हा परिषदेच्या निवडणुकांसाठी मुख्य समन्वयक म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. वळसे पाटील हे राज्यातील २२ जिल्हयात होणाऱ्या निवडणुकीत समन्वयकाचे काम करतील. तसेच पक्ष मजबूतीसाठी तत्काळ आराखडा तयार करणार आहेत, असे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी बैठकीनंतर पत्रकारांना सांगितले.

मतदार नोंदणी अधिकारी आणि मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरिक्षण संदर्भात माजी मंत्री नवाब मलिक यांची प्रमुख समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यांच्या समवेत आमदार अनिल भाईदास पाटील सहसमन्वयक म्हणून काम करणार आहेत. ‘माझे बूथ, माझे गाव’ या उपक्रमाचा आढावा बैठकीत घेण्यात आला. सदर उपक्रम गतीमान करण्यावर चर्चा झाली.

दिवंगत पक्षाध्यक्ष अजित पवार हे तरुणाईमध्ये लोकप्रिय होते. त्यामुळे पक्षाने तरुणाईसाठी कार्यक्रम घेऊन जायचे निश्चित केले आहे. मतदारसंघाची पुनर्रचना आणि सीमांकन लागू होण्यापूर्वी पक्षाचा मतदारवर्ग आणि पक्षाचे बालेकिल्ले मजबूत करणे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे, असेही तटकरे म्हणाले. इतर मागास वर्गाच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, अशी राष्ट्रवादीची भूमिका कायम आहे, असे तटकरे यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.

पक्षाध्यक्ष सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीला राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, मंत्री छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, दत्ता भरणे, मकरंद पाटील, बाबासाहेब जाधव, राज्यमंत्री इंद्रनील नाईक, खासदार पार्थ पवार, शिस्त समितीचे जय पवार, आमदार धनंजय मुंडे, शिवाजी गर्जे उपस्थित हाेते. मागच्या पंधरा दिवसातील पक्षाच्या गाभा समितीची ही तिसरी बैठक आहे.