मुंबई : महापौर पदाची निवडणूक तोंडावर आली तरी राष्ट्रवादी (अजित पवार) गटाची नोंदणी अद्याप झालेली नाही. वैधानिक समित्यांमध्ये विरोधकांवर मात करण्यासाठी भाजप-शिवसेना (शिंदे) महायुतीने संख्याबळाची जुळवाजुळव करण्याकरीता राष्ट्रवादी (अजित पवार) गटाला सोबत घेण्याचे ठरवले असले तरी राष्ट्रवादीची गटनोंदणी न झाल्यामुळे शिवसेना (शिंदे) पक्षाचा जीव टांगणीला लागला आहे. या गटनोंदणीसाठी कायद्याचा कीस पाडला जात असून शिवसेनेला पाठिंबा देण्यापूर्वी राष्ट्रवादी (अजित पवार) गट प्रचंड सावधगिरी बाळगत असल्याची चर्चा आहे.
मुंबई महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी येत्या ११ फेब्रुवारीला निवडणूक होणार आहे. मुंबई महापालिकेत निवडणून आलेल्या सर्व राजकीय पक्षांची गटनोंदणी झालेली असली तरी राष्ट्रवादी (अजित पवार) गटाची गटनोंदणी रखडलेली आहे. या पक्षाचे तीन नगरसेवक असून या नगरसेवकांची नोंदणी गुरुवारी झाली. मात्र गट म्हणून या तीन नगरसेवकांची अद्याप नोंदणी झालेली नाही.
मुंबई महापालिकेत भाजपला स्पष्ट बहुमत आहे. महायुतीत भाजपला ८९ जागा आणि शिवसेना (शिंदे) पक्षाला २९ जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे दोघांचे मिळून ११८ नगरसेवक निवडून आले आहेत. महायुतीला आपला महापौर निवडून आणणे सहज शक्य असले तरी वैधानिक समित्यांमध्ये विरोधकांचे आणि सत्ताधाऱ्यांचे समसमान संख्याबळ होत होते. त्यामुळे महत्त्वाचे प्रस्ताव मंजूर करणे सत्ताधाऱ्यांसाठी अवघड झाले असते. त्यावर तोडगा म्हणून आधी भाजप आणि शिवसेना (शिंदे) पक्ष संयुक्त गटनोंदणी करणार होते.
मात्र नंतर या दोन्ही पक्षाच्या नगरसेवकांनी स्वतंत्र गट स्थापन केले. राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाच्या तीन नगरसेवकांना सोबत घेऊन शिवसेना (शिंदे) पक्ष एक गट तयार करणार असल्याचा मार्ग काढण्यात आला. मात्र राष्ट्रवादी पक्षाच्या नगरसेवकांनी अद्याप आपल्या पाठिंब्या संदर्भातील गटनोंदणी केलेली नाही. ही गटनोंदणी गुरुवारी देखील होऊ शकली नाही. त्यामुळे शिवसेना आणि पर्यायाने महायुतीचे वैधानिक समित्यांचे घोडे अडले आहे.
दरम्यान, याबाबत शिवसेना (शिंदे) पक्षाचे गटनेते अमेय घोले यांनी सांगितल की, एकत्र गटनोंदणीबाबतची प्रक्रिया सुरू असून अद्याप चर्चा सुरू आहे. याबाबत कायद्याचा पूर्ण अभ्यास करून निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी सांगितले. तर राष्ट्रवादी (अजित पवार) गटाच्या गटनेत्या डॉ. सईदा खान यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या प्रकरणी प्रक्रिया सुरू असल्याचे सांगितले.
राष्ट्रवादीला भीती कशाची ?
राष्ट्रवादीच्या तीन नगरसेविका निवडून आल्या असून माजी आमदार नवाब मलिक यांची बहिण डॉ. सईदा खान या गटनेत्या आहेत. शिवसेना (शिंदे) गट आणि राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू असली तरी प्रत्यक्षात ही गटनोंदणी रोज पुढे ढकलली जात आहे.
अजित पवार गटाने पाठिंबा दिल्यास राष्ट्रवादीचे महापालिकेतील स्थान काय असेल, पक्ष कार्यालय मिळेल का, गटनेता पद मिळेल का असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. दोन पक्ष एकत्र आल्यामुळे खरोखरच संख्याबळ वाढणार का आणि वाढल्यास त्याचा राष्ट्रवादीला काय फायदा होणार याबाबत अजित पवार गटाच्या मनात संशय असल्यामुळे ही नोंदणी पुढे ढकलली जात असल्याची चर्चा आहे.
गटनेता पद राहणार का
स्वतंत्र गटनोंदणी करून मग दोन्ही पक्षांनी एकत्र गट स्थापन केल्यास त्यांचे स्वतंत्र गटनेते पद अबाधित राहते का याबाबत महापालिकेच्या कायद्यात कोणतेही सुस्पष्ट निर्देश नाहीत. गटनेता पद हे वैधानिक नाही. गटनेता पदाला मान्यता देणे हा केवळ महापौरांचा अधिकार आहे. महापौर पद भाजपकडे असल्यामुळे राष्ट्रवादीचे गटनेता पद हे पुढे भाजपच्या इच्छेवरच राहील, ही भीती देखील अजित पवार गटाला असणार आहे.

