Nawab Malik Son in Law Passed Away: राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री नवाब मलिक यांचे जावई, मुलगी निलोफर खानचे पती समीर खान यांचा सप्टेंबर महिन्यात कुर्ल्यात एका रुग्णालयाबाहेर भीषण अपघात झाला होता. समीर खान यांच्याच थार गाडीच्या चालकाने थार गाडी समीर खान यांच्या अंगावर चढवली होती. ॲक्सिलेटरवर चुकून पाय पडल्याने गाडीवरील नियंत्रण सुटल्याचे चालकाने सांगितले होते. या अपघातामध्ये त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. तेव्हापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. या अपघातात निलोफर खान यांच्याही हाताला दुखापत झाली होती. अखेर आज समीर खान यांचे निधन झाल्याची माहिती नवाब मलिक यांनी त्यांच्या एक्स अकाऊंटवर पोस्ट टाकत दिली आहे.

अपघात नेमका कसा झाला?

समीर खान आणि त्यांची पत्नी निलोफर हे दोघे सप्टेंबर महिन्यात घराजवळील क्रिटी केअर हॉस्पिटलमध्ये नियमित आरोग्य तपासणीसाठी गेले होते. तपासणी झाल्यानंतर दोघेही बाहेर आले. यानंतर समीर खान यांनी चालकाचा वाहन घेऊन येण्यास सांगितले. यावेळी चालकाकडून वाहन घेऊन येताना चुकून ब्रेक ऐवजी ॲक्सिलेटरवर पाय पडला आणि थार जोरात येऊन समीर खान यांना धडकली. यामध्ये समीर खान यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. समीर खान बरेच दिवस आयसीयूमध्ये होते. यानंतर चालक अब्दुल अन्सारी (३८) याला विनोबा भावे नगर पोलिसांनी ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला. त्यानंतर त्याची जामीनावर तात्काळ सुटका देखील झाली होती.

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाचे नेते बाबा सिद्दिकी यांची १२ ऑक्टोबर रोजी हत्या करण्यात आली होती. त्याच रात्री समीर खान यांचेही निधन झाल्याची अफवा पसरली होती. अनेकांनी यासंदर्भात सोशल मीडियावर पोस्ट टाकल्या होत्या. मात्र काही वेळाने नवाब मलिक यांनी एक्सवर पोस्ट करून त्यांचे निधन झाले नसल्याचा खुलासा केला होता. अखेर आज समीर खान यांची प्राणज्योत मालवल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.

मुलगी सना मलिक निवडणुकीच्या रिंगणात

नवाब मलिक यांना निलोफर खान आणि सना मलिक अशा दोन मुली आहेत. सना मलिक समाजकारण आणि राजकारणात सक्रियपणे काम करते. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाने सना मलिक यांना अणुशक्ती नगर विधानसभेतून उमेदवारी जाहीर केलेली आहे. सना मलिक यांच्या विरोधात शरद पवार गटाकडून अभिनेत्री स्वरा भास्कर यांचे पती फहाद अहमद यांना उमेदवारी दिलेली आहे. तर नवाब मलिक खुद्द शिवाजी नगर – मानखुर्द या मतदारसंघातून निवडणुकीसाठी उतरले आहेत. घरातील दोन व्यक्ती विधानसभेची तयारी करत असताना मलिक कुटुंबियांवर समीर खान यांच्या निधनामुळे दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

j

Story img Loader