मुंबई : अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने बुधवारी मुंबई महानगरपालिका निवडणुकीचा जाहिरनामा प्रसिद्ध केला. त्यामध्ये भटक्या श्वानांचा बंदोबस्त, ७०० चाै. फूटापर्यंत घरांना मालमत्ता करांमध्ये माफी आणि धूळमुक्त शहर अशी मुख्य तीन वचन हमी दिली आहे.

वानखेडे स्टेडियम येथे बुधवारी झालेल्या कार्यक्रमास पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे, मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेस निवडणूक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नवाब मलिक, आमदार सना मलिक-शेख, महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर, मुंबई कार्याध्यक्ष शिवाजी नलावडे, मुंबई कार्याध्यक्ष सिध्दार्थ कांबळे, प्रदेश सरचिटणीस संजय तटकरे उपस्थित होते.

यावेळी तटकरे म्हणाले की, मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस ९४ जागांवर स्वतंत्रपणे लढत आहे. त्यामध्ये ५६ मराठी भाषिक, २१ उत्तर भारतीय, २४ मुस्लिम, ३ ख्रिश्चन उमेदवार आहेत. ५० महिलांना उमेदवारी दिली आहे. मुंबई शहरात बहुभाषिक, बहुजातीय नागरीक राहतात, या सर्वांना विश्वासात घेऊन पक्ष निवडणुकीला सामोरे जात आहे, असा दावा तटकरे यांनी केला.

शेख हसीना यांना हाकला : नवाब मलिक

मुंबईत मोठ्या संख्येने बांग्लादेशी मतदार असल्याचा आरोप भाजपाचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी केल्याबाबत विचारले असता, नवाब मलिक म्हणाले की, बांग्लादेशी मुस्लीमांचा प्रत्येक निवडणुकीत भाजपाकडून बाऊ केला जातो. यामागे हिंदू मतांच्या ध्रुवीकरणाचा डाव असतो. बांग्लादेशच्या पदच्युत पंतप्रधान शेख हसीना यांना भारतातून भाजपने प्रथम हाकलावे. अमीत साटम यांच्या अंधेरी पश्चिम मतदारसंघात ६० हजार मुस्लीम मतदार आहेत. तेथे साटम काही बोलत नाहीत. त्यांच्या घरी जातात, खातात. त्यात काही बांग्लादेशी आहेत काय ?

असा आहे जाहीरनामा :

  • ५०० किमी नवे रस्ते बांधणार. स्मार्ट सिटी योजनेंतर्गत सीसीटीव्ही, वायफाय आणि डिजिटल सेवांचा विस्तार. नव्या रोजगार केंद्रांची निर्मिती, एआय चलित नियंत्रण केंद्रासह स्मार्ट ट्रॅफिक सिग्नल यंत्रणांची उभारणी. अंतर्गत रस्त्यांचे जाळे खुले करुन रहदारीवर नियंत्रण.
  • जुन्या चाळी आणि झोपडपट्टीमध्ये मोफत पाणी पुरवठा. २४×७ स्वच्छ व पुरेसा पाणीपुरवठा. पाणी गळती रोखण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान. २०३० पर्यंत ‘स्मार्ट वॉटर मिटर’ द्वारे जलसाक्षर वॉर्ड मिशन राबवणार.
  • प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी. नाले आणि नद्या स्वच्छ करण्यासाठी ‘नदी पुनरुज्जीवन’ अभियान. अतिवृष्टी पूर नियंत्रणासाठी नवी मलजल वाहिन्यांमध्ये सुधारणा. घनकचरा कराची प्रभावी आखणी. कचरा क्रेडीट प्रमाणपत्र प्रणाली राबवणार, सफाई कामगारांना लाड-पागे समितीच्या धोरणानुसार मोफत घरे आणि आरोग्य विमा.
  • प्रत्येक वॉर्डात प्रगत प्राथमिक आरोग्य केंद्र. प्रत्येक रुग्णालयातील अत्याधुनिक ‘डॅशबोर्ड’ प्रणाली उभारणार. टेली कन्सल्टींग सुविधांसह मनपा रुग्णालयाचे २४×७ आरोग्य कल्याण केंद्रामध्ये रुपांतर. मनपा शाळेत विद्यार्थ्यांना ‘हेल्थकार्ड’. भटक्या श्वानांचा प्रभावी बंदोबस्त आणि पाळीव श्वानांच्या परवान्यांची प्रभावी अमंलबजावणी.
  • मुंबईला ग्रीन सिटी बनवण्यासाठी १० लाख झाडे लागवड. प्रदूषण नियंत्रणासाठी इलेक्ट्रिक बस आणि सीएनजी वाहनांना प्रोत्साहन. हवा गुणवत्ता मॉनिटरींग सिस्टम, जलवायू बदलाशी लढण्यासाठी ‘क्लायमेट रेझिलिएट मुंबई’ योजना. धुळमुक्त मुंबईसाठी आधुनिक यंत्र सामग्रीचा वापर.
  • एक लाख नव्या घरांची निर्मिती. एसआरए योजनेची वेगवान अंमलबजावणी. ७०० चौ. फुटांपर्यंत मालमत्ता करमाफी. नोकरीतील महिलांसाठी वसतीगृहांची उभारणी. ऑलिम्पिक दर्जाचे स्टेडियम आणि युवा क्लब. नागरिकांच्या तक्रारींसाठी २४×७ हेल्पलाईन. ई-गव्हर्नसन्सद्वारे सर्व सेवा ऑनलाइन, भ्रष्टाचारमुक्त मनपा प्रशासन.