मुंबई : नगरपरिषद व नगरपंचायतीच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून (अजित पवार) ४० स्टार प्रचारकांची यादी गुरुवारी प्रसिद्ध करण्यात आली. त्यामध्ये मारकुटा प्रदेश सरचिटणीस सूरज चव्हाण, पक्षपाती म्हणून आरोप होत असलेल्या महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर आणि बीड जिल्ह्यातल्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातले आरोपी निकटवर्तीय निघाल्याने मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागलेले राज्याचे माजी कृषी मंत्री धनंजय मुंडे या तिघा वादग्रस्त नेत्यांना स्टार प्रचारकांच्या यादीत स्थान देण्यात आले आहे.
राष्ट्रवादीच्या स्टार प्रचारकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष व खासदार प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष व खासदार सुनिल तटकरे, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, कृषीमंत्री दत्तात्रय भरणे, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे, पर्यटन राज्यमंत्री इंद्रनील नाईक या मातब्बरांची वर्णी लागली आहे.
त्याचबरोबर माजी मंत्री धर्मरावबाबा आत्राम, माजी मंत्री अनिल भाईदास पाटील, माजी मंत्री संजय बनसोडे, आमदार प्रताप पाटील – चिखलीकर, माजी मंत्री नवाब मलिक, अभिनेते व नेते सयाजी शिंदे, अल्पसंख्याक महामंडळाचे अध्यक्ष मुश्ताक अंतुले, माजी खासदार समीर भुजबळ, आमदार अमोल मिटकरी, आमदार सना मलिक – शेख, आमदार इद्रीस नायकवडी यांना स्टार प्रचारकाचा मान देण्यात आला आहे.
माजी आमदार अनिकेत तटकरे, माजी आमदार झिशान सिद्दीकी, माजी आमदार राजेंद्र जैन, मुंबई कार्याध्यक्ष सिध्दार्थ कांबळे, लहू कानडे, ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष कल्याण आखाडे, सामाजिक सेलचे प्रदेशाध्यक्ष सुनील मगरे, अल्पसंख्याक सेलचे प्रदेशाध्यक्ष नाझेर काझी, महेश शिंदे, श्रीमती राजलक्ष्मी भोसले, सुरेखाताई ठाकरे, नजीब मुल्ला, प्रतिभा शिंदे, विकास पासलकर या तिसऱ्या फळीतील नेत्यांना स्टार प्रचारक म्हणून संधी देण्यात आली आहे.
या कुटुंबाला लाभ :
प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे पक्षाचे खासदार असून ते स्वत: स्टार प्रचारक आहेत. त्याचबरोब त्यांची मुलगी व राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे आणि मुलगा माजी आमदार अनिकेत तटकरे यांनाही स्टार प्रचारकाच्या यादीत सामील करण्यात आले आहे.
तटकरे आहेत कोण?
तटकरे कुटुंबिय कोकणातील रोहा तालुक्यातील आहे. पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांचे निकटवर्तीय म्हणून प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना ओळखले जाते. राष्ट्रवादीचा सर्वाधिक लाभ तटकरे कुटुंबाला झाल्याचा शरद पवार राष्ट्रवादी गटाचे आमदार रोहित पवार यांनी अनेकदा आरोप केलेला आहे.
