भाजपाचे नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी महाराष्ट्रातील महाविकासआघाडी सरकार लवकरच पडेल आणि भाजपाचं सरकार स्थापन होईल, अशी राजकीय भविष्यवाणी केली. याशिवाय विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार अचानक दिल्लीला रवाना झाल्यानं राजकीय तर्कवितर्कांना उधाण आलं. याच पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर फडणवीस आणि पवार अमित शाह यांची भेट घेत असल्याचा फोटो व्हायरल झाला. याला राष्ट्रवादी काँग्रेसने प्रत्युत्तर दिलंय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राष्ट्रवादी काँग्रेसने म्हटले, “अधिवेशनाच्या तोंडावर सरकार पाडण्याच्या ‘गजाल्या’ सुरू झाल्यात. त्यासाठी ‘असले’ मॉर्फ केलेले बचकांडे हातखंडे. पण आता मॉर्फला माफी नाही. फसव्या फोटोशॉप जल्पकांचा (ट्रोल्स) शोध घेणं अवघड नाही. महाराष्ट्र सायबर खात्याने असले छुपे छद्मउद्योग करणाऱ्यांना शोधून काढावे ही विनंती.”

मुंबईतील सर्व कार्यक्रम रद्द करून शरद पवार दिल्लीत दाखल

दरम्यान, शरद पवार अचानक सर्व कार्यक्रम रद्द करून दिल्लीत दाखल झाले होते. शरद पवार यांच्यासोबत प्रफुल्ल पटेलदेखील राजधानी दिल्लीत पोहोचले होते. विशेष म्हणजे विधानसभा विरोधी पक्षनेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटीलदेखील दिल्लीत आहेत. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं होतं.

“सरकार पाडून नवं सरकार स्थापन करायचं असेल तर काही गोष्टी गुपित…”

नारायण राणे म्हणाले होते, “महाराष्ट्रात भाजपाचं सरकार नाही त्यामुळे तिथं तसं होतंय. लवकरात लवकर महाराष्ट्रात भाजपाचं सरकार येईल आणि तुम्हाला अपेक्षित बदल दिसेल. माझ्या आतमध्ये जी गोष्ट आहे ती आत्ताच बाहेर सांगायची नाहीये. एखादं सरकार पाडायचं असेल आणि नवं सरकार स्थापन करायचं असेल तर काही गोष्टी गुपित ठेवाव्या लागतात. अशा ठिकाणी काही बोललो तर आणखी एखादा महिना पुढे ढकलेल.”

“आजारी आणि बेडवर असलेल्या व्यक्तीवर नाव घेऊन बोलणं योग्य वाटत नाही”

उद्धव ठाकरे यांचं सरकार फार दिवस नसेल का असं विचारलं असता नारायण राणे यांनी जो व्यक्ती आजारी आहे आणि बेडवर आहे त्या व्यक्तीवर नाव घेऊन बोलणं योग्य नाही असं उत्तर दिलं. तसेच महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस या तीन पक्षांचं आघाडीचं सरकार आहे त्याचं आयुष्य जास्त नसल्याचाही सूचक इशारा राणेंनी दिला. यावेळी पत्रकारांनी मार्चपर्यंत सरकार बदलणार का असं विचारलं असता त्यांनी हसत त्यावर उत्तर देणं टाळलं.

हेही वाचा : निलेश साबळेने पाया पडून मागितली नारायण राणेंची माफी; जाणून घ्या कारण

“नारायण राणे काय बोलतात याकडे लक्ष देत नाही”

नारायण राणे यांच्या या राजकीय भविष्यवाणीवर शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांनी प्रत्युत्तर देत नारायण राणे यांच्याकडे लक्ष देत नसल्याचा खोचक टोला लगावला.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp answer on viral photo of amit shah devendra fadnavis sharad pawar pbs
First published on: 26-11-2021 at 19:43 IST