मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाण्यातील सभेत राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. गुढीपाडवा मेळाव्यात केलेल्या भाषणावर टीका करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व नेत्यांना नावं घेत राज ठाकरेंनी उत्तरं दिली. यामध्ये छगन भुजबळ यांचाही समावेश होता. दरम्यान राज ठाकरेंनी शरद पवारांपासून ते भुजबळांपर्यंत सर्वांवरच टीका केल्याने एकीकडे पक्षाचे नेते आक्रमक झाले असताना दुसरीकडे भुजबळांचे पुत्र पंकज भुजबळ शिवतीर्थावर पोहोचल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

पंकज भुजबळ सकाळी राज ठाकरेंचं निवासस्थान शिवतीर्थवर पोहोचले होते. या भेटीचं नेमकं कारण समजू शकलं नव्हतं. मात्र राज ठाकरेंच्या सभेतील भाषणामुळे आधीच राजकीय वातावरण तापलं असताना त्यातच ही भेट झाल्याने राजकीय वर्तुळात मात्र चर्चा रंगली आहे.

दरम्यान पंकज भुजबळ यांच्याआधी भाजपा नेते कृपाशंकर सिंग राज ठाकरेंच्या भेटीला पोहोचले होते. दोघांमध्ये जवळपास अर्धा तास चर्चा झाली. यानंतर कृपाशंकर सिंग यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना हिंदुत्वाच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं समर्थन केलं.

राज ठाकरेंच्या घऱी नेत्यांची लगबग –

राज ठाकरेंनी गुढीपाडव्याला केलेल्या भाषणानंतर त्यांच्या घऱी नेत्यांची लगबग पहायला मिळत आहे. गुढीपाडव्याच्या भाषणानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी तसंच रावसाहेब दानवे यांनी त्यांची भेट घेतली होती.

राज ठाकरेंची भुजबळांवर टीका –

राज ठाकरे यांनी भोंग्याचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर भुजबळांनी त्यांच्यावर टीका करताना एका ईडीच्या नोटीसने कोहिनूर टॉवर हालायला लागला असा टोला लगावला होता. राज ठाकरे यांनी भुजबळांना म्हटलं की, “भुजबळ साहेब तुम्हाला तुमचे सीए, तुमच्या माणसांमुळे, केलेल्या कामामुळे आत जावं लागलं. मोदींवर केलेल्या टीकेमुळे नाही. दोन अडीच वर्ष तुरुंगात काढल्यानंतर पहिला शपथविधी यांचा कसा होतो?”.