मुंबई :  ५० वर्षांपूर्वी छोटेसे रोपटे लावलेल्या आणि गोरेगावकरांशी समरस असलेल्या प्रबोधन या एका चांगल्या संस्थेचा आज वटवृक्ष झाला आहे, असे गौरवोद्गार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी काढले. आपण देशाचे, समाजाचे काही देणे लागतो, या भावनेतून प्रबोधन संस्था काम करीत आहे. पण काही महाभाग नुसते घेतच चालले असल्याची खोचक टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर केली.

प्रबोधन गोरेगाव या संस्थेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षांची सांगता पवार यांच्या उपस्थितीत झाली. त्या वेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दृक् श्राव्य माध्यमातून उपस्थित होते. पवार यांच्या हस्ते प्रबोधनाची पन्नाशी या कॉफी टेबल बुकचे आणि या संस्थेच्या गेल्या ५० वर्षांच्या वाटचालीच्या चित्रफितीचे प्रकाशन करण्यात आले. या वेळी संस्थापक व उद्योगमंत्री सुभाष देसाई, खासदार अरिवद सावंत, खासदार गजानन कीर्तिकर, प्रबोधन गोरेगावचे अध्यक्ष नितीन शिंदे आदी उपस्थित होते. प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक, गायक अजय-अतुल यांच्या गाण्यांच्या कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले होते.

या वेळी पवार म्हणाले की, प्रबोधनकार ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या सामाजिक वाटचालीत एक वेगळी भूमिका मांडली. समाजातील वाईट प्रवृत्तीच्या विरोधात त्यांनी आपली लेखणी चालविली. फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांचे ते पुरस्कर्ते होते. प्रबोधनकारांचा आदर्श ठेवून या संस्थेने महाराष्ट्राच्या सामाजिक क्षेत्रांत आपला ठसा उमटवला आहे. मराठी माणसाला एकत्र ठेवणे आजच्या काळात खूप गरजेचे आहे आणि तेच काम प्रबोधन गोरेगाव ही संस्था करत आहे, असे सांगून मुख्यमंत्री  ठाकरे म्हणाले,  ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण अशी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिकवण होती. त्यानुसार देसाई व प्रबोधन संस्था काम करीत आहे. सुभाष देसाई  यांनी प्रास्ताविकात संस्थेची माहिती दिली.