टाटा मेमोरियल रुग्णालयाला ‘म्हाडा’च्या १०० सदनिकांचा ताबा

शरद पवार यांच्याकडून सरकारचे आभार

शरद पवार यांच्याकडून सरकारचे आभार

मुंबई : मानवतेच्या दृष्टिकोनातून मुंबई शहरात कर्करोगग्रस्त रुग्णांच्या नातेवाईकांची व काळजीवाहू व्यक्तींच्या निवासाची सोय करता यावी या उद्देशाने महाराष्ट्र शासनातर्फे महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाने (म्हाडा) उपलब्ध करून दिलेल्या १०० सदनिकांच्या चाव्या रविवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या हस्ते टाटा मेमोरियल रुग्णालयाला सुपूर्द करण्यात आल्या.

शरद पवार यांच्या निवासस्थानी झालेल्या या कार्यक्रमाला गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड, गृहनिर्माण विभागाचे प्रधान सचिव  एस. व्ही. आर. श्रीनिवास, ‘म्हाडा’चे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल डिग्गीकर, टाटा मेमोरिअल सेंटरचे संचालक डॉ. राजेंद्र बडवे, टाटा मेमोरियल रुग्णालयाचे उपसंचालक डॉ. शैलेश श्रीखंडे आदी उपस्थित होते. म्हाडाच्या या १०० सदनिकांचा ताबा टाटा रुग्णालयाला देताना मनापासून आनंद वाटत आहे. या उपक्रमाबद्दल राज्य सरकारचे आभार. रुग्णांच्या नातेवाईकांची होणारी गैरसोय यामुळे दूर होईल, असे शरद पवार यांनी म्हटले आहे. सदनिका उपलब्ध करण्यासाठी जितेंद्र आव्हाड यांनी पुढाकार घेतला होता.

टाटा मेमोरियल रुग्णालयात देशभरातून रुग्ण येत असतात. सोबतच त्यांचे नातेवाईक व काळजीवाहू व्यक्ती येतात; परंतु त्यांच्या राहण्याची व्यवस्था नसल्याने किंवा खासगी निवासस्थानाची सोय असलेले ठिकाण आर्थिकदृष्टय़ा परवडत नसल्याने बरेचदा नातेवाईकांना पदपथावर राहावे लागत असल्याने त्यांची गैरसोय होते. ही गैरसोय टाळण्यासाठी शासनाने रुग्णालयाशेजारी असलेल्या १०० सदनिका रुग्णालयाला सोपविण्याचा निर्णय घेतला.

परळ शिवडी विभाग, महादेव पालव मार्ग, डॉ. बी. ए. रोड, करी रोड मुंबई येथील हाजी कासम चाळ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या मालमत्तेच्या समूह पुनर्विकास योजनेमधून म्हाडाचा विभागीय घटक असणाऱ्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळास एकू्ण १८८ सदनिका प्राप्त झाल्या आहेत. यापैकी सद्य:स्थितीत ३०० चौरस फूट असलेल्या १०० सदनिका टाटा मेमोरियल रुग्णालयास उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या १०० सदनिका नाममात्र दराने (१ रुपया प्रति वर्ष) भाडेपट्टा करारनाम्यानुसार म्हाडाच्या अटी व शर्तीच्या अधीन राहून विशेष बाब म्हणून टाटा मेमोरियल रुग्णालयास उपलब्ध करून देण्यात आल्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Ncp chief sharad pawar hand over 100 mhada flat keys to tata cancer hospital zws