राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज साताऱ्यात पत्रकार परिषद सुरु असताना दरवाजा लॉक झाल्यामुळे सभागृहात अडकून पडले होते. पवारांसह काही पत्रकारही आतमध्ये अडकले होते. बरेच प्रयत्न करुनही दरवाजा उघडत नसल्यामुळे अखेर दरवाजा तोडून शरद पवारांना बाहेर काढावे लागले. रयत शिक्षण संस्थेच्या कार्यक्रमासाठी बुधवारी शरद पवार साताऱ्यात आले होते. त्यावेळी ही घटना घडली. कार्यक्रम संपल्यानंतर पत्रकार परिषद सुरु असताना हा प्रकार घडला.

कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमासाठी शरद पवार साताऱ्यात आले होते. सकाळी अकराच्या सुमारास पत्रकार परिषद सुरु असताना हा प्रकार घडला. पत्रकार परिषद सुरु झाल्यानंतर काही पत्रकार आतमध्ये येण्याचा प्रयत्न करत होते. त्यावेळी दरवाजा लॉक झाल्याचे लक्षात आले. बाहेर उभे असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते जोर लावून दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करत होते. पण दरवाजा उघडत नव्हता.

हा प्रकार शरद पवारांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी स्वत: दरवाजापाशी जाऊन दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. पण दरवाजा उघडला जात नव्हता. त्यावेळी पवार गोंधळल्याचे किंवा त्रासल्याचे कोणतेही भाव त्यांच्या चेहऱ्यावर नव्हते. उलट मिश्किल हास्य त्यांच्या चेहऱ्यावर होते. स्वभावाप्रमाणे त्यांनी आत अडकलेल्या पत्रकार, कार्यकर्त्यांना धीरच दिला. प्रयत्न करुनही दरवाजा उघडत नसल्याचे लक्षात आल्यानंतर अखेर बाहेर असलेल्या कार्यकर्त्यांनी लॉक तोडले त्यानंतर पवारांसह सर्वच बाहेर आले.